मुंबई : हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर राजीव सातव निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेऊ शकतात.
राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत. गुजरातची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची असल्याने सातव यांना तिथेच काम करण्याची इच्छा आहे. मात्र आता हिंगोलीतून निवडणूक लढवायची की गुजरातमध्ये काम करायचं याचा निर्णय राजीव सातव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवला आहे.
2014 मध्ये रोमहर्षक विजय
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांचा विजय झाला होता. या रोमहर्षक लढतीत राजीव सातव यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे आणि बसपाचे उमेदवार चुन्ननीलाल जाधव यांचा पराभव करत हिंगोलीची जागा काँग्रेसच्या खात्यात जमा केली होती.
शिवसेना-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर
हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात 1991 पासून काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून हिंगोलीचं तिकीट कोणाला देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी उमेदवारीसाठीहेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस असल्याचं म्हटलं जात आहे.
राहुल गांधी काय निर्णय घेणार?
आता यंदाच्या निवडणुकीत राजीव सातव निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय काँग्रेसची महाराष्ट्रातील 48 पैकी अद्याप पाचच नावं जाहीर झाली आहेत. त्यामुळे पुढील याद्यांमध्ये उर्वरित 43 नावं जाहीर होतील. काँग्रेस अध्यक्षांनी ठरवलं तर यामध्ये राजीव सातव यांचाही समावेश असू शकतो.