नागपूर: लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न  चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली. काँग्रेसचे सदस्य असताना पाटील यांनी बंडखोरी करत  शिवसेना उमेदवाराचा लाजीरवाणा पराभव केला होता. निवडून आल्यानंतर विशाल पाटील (Vishal Patil) यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला, पण तोवर नुकसान झालं होतं. आता राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, विदर्भातील काटोल मतदारसंघात असाच एक प्रसंग घडू शकतो, ज्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला धोका निर्माण होऊ शकतो.


काटोलमध्ये, माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकर यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकर मविआच्या तिकीटासाठी दावेदार आहेत. परंतु सद्यस्थितीत काटोल मतदारसंघ शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) ताब्यात आहे. माजी गृहमंत्री आणि काटोलचे विद्यमान आमदार अनिल देशमुख हे जिचकर यांना तिकीट देण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले जात आहे.


अनिल देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून येणाऱ्या राज्य निवडणुकीत लढण्याचा विचार करीत आहेत. तर त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना काटोलमधून निवडणुकीसाठी उभं करणार असल्याचंही सांगितलं जातं. गेल्या काही महिन्यांत देशमुखांनी फडणवीसांवर केलेले सततचे हल्ले ही या दीर्घकालीन योजनेचा भाग असल्याचं स्पष्ट होतं. दुसरीकडे, याज्ञवल्क्य जिचकर, गेल्या ३-४ वर्षांपासून काटोलमध्ये शांतपणे काम करत आहेत, त्यांचा विश्वास आहे की, त्यांच्या स्थानिक कामाचा फायदा निवडणुकीत होईल. जिचकर यांनी युवक रोजगारासाठी अनेक शिबिरं आयोजित केली आहेत आणि ६,००० हून अधिक युवकांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.


काटोलचा इतिहास याज्ञवल्क्य जिचकरांच्या पथ्यावर पडणार?


“जिचकर आपल्या वडिलांची राजकीय परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. श्रीकांत जिचकर यांनी राज्याच्या राजकारणात ठसा उमटवला होता आणि एकदा ते मुख्यमंत्री होण्याच्या जवळ होते,” असं एका महायुतीच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.


अनिल देशमुख 1995 पासून काटोलमधून निवडून आले आहेत—फक्त 2014 मध्ये त्यांच्या पुतण्याकडून ते पराभूत झाले होते. काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे की विरोधी लाट जिचकर यांच्या बाजूने काम करू शकते. नुकतेच अशिष देशमुख यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि ते भाजपकडून तिकीट मागत आहेत.


काँग्रेसमधील सूत्रांच्या मते, पक्ष नेतृत्वाने जिचकर यांना राष्ट्रवादीला (पवार) सीट सोडण्यासाठी तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, जर हे साध्य झाले नाही, तर जिचकर अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा विचार करू शकतात. त्यांना विश्वास आहे की, त्यांचे काम आणि त्यांच्या वडिलांची राजकीय परंपरा मतदारांना आकर्षित करेल. काटोलमध्ये अपक्ष उमेदवारांना अधिक संधी मिळण्याचा इतिहास आहे. अनिल देशमुख स्वतः 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. 1985 मध्ये डॉ. श्रीकांत जिचकर यांना देखील अपक्ष उमेदवार सुनील शिंदे यांनी पराभूत केले होते.


आणखी वाचा


राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजकीय वारसदार निवडला? सलील देशमुखांची काटोल मतदारसंघात सक्रियता