नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचा हा जाहीरनामा देश तोडणारा असून, देशासाठी खूप घातक आहे, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात "आम्ही सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करणार" असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. "देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर गुन्हा वाटत नाही का?" असा सवाल जेटली यांनी उपस्थित केला आहे.

जेटली म्हणाले की, कांग्रेसच्या जाहीरनाम्यात अशी वचनं दिली आहेत, जी या देशासाठी, देशाच्या एकतेसाठी घातक आहेत. नेहरु-गांधी परिवाराने जम्मू काश्मीरबाबत ज्या ऐतिहासिक चुका केल्या, राहुल गांधी त्याच अजेंड्याला पुढे नेण्याचे काम करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती परिस्थिती बदलण्याऐवजी ती वाढवण्याचा विचार काँग्रेस करत असल्याचे त्यांच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याच्या आश्वासनाशिवाय शेती आणि उद्योग क्षेत्रासाठीही अनेक मोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांसाठी 'न्यूनतम आय योजना' अर्थात 'न्याय' सुरु करण्याचे वचन दिले आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला 'जन आवाज' हे नाव दिले आहे.