अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत, तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुजय विखे यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे.


सुजय यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. पत्नीकडे मात्र प्रवरा बँकेचे 26 लाख 23 हजारांचे कर्ज आहे. विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणेंवर किती कर्ज? बीडमधील उमेदवारांच्या संपत्तीचं विवरण

सुजय यांच्याकडे 4 कोटी 91 लाखांची जंगम आणि 6 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सुजय विखे यांच्याकडे केवळ 1 लाख 16 हजार 295 रुपयांची रोकड आहे. तर पत्नीकडे 1 लाख 37 हजार 485 रुपये रोकड आहे.
आंबेडकर, शिंदे, स्वामी; सोलापुरातील उमेदवारांची मालमत्ता किती?

सुजय यांच्याकडे 3 कोटी 65 लाख 23 हजार 468, तर पत्नीकडे 1 कोटी 90 लाख 91 हजार 617 रुपयांच्या बँक खात्यातील ठेवी आहेत. सुजय यांच्याकडे 5 लाख 71 हजार 300 रुपयांचे आणि पत्नीकडे 67 हजार रुपयांचे शेअर्स गुंतवणूक आहेत. विखे यांची 16 लाख 65 हजार रुपयांची, तर पत्नीकडे 5 लाख 85 हजार रुपयांची विमा पॉलीसी आहे.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता.

सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. अहमदनगरची लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.