सोलापूर : कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. करमाळ्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा मुलगा शंभूराजे जगताप यांनी आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
करमाळा तालुका हा कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता शंभूराजे जगताप यांच्या भाजप प्रवेशाने आघाडीचे करमाळ्यात मोठे नुकसान झाले आहे. आज भाजपच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात शंभूराजे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुलं पळवणारे म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सोशल मेडीयावर खिल्ली उडवली जात आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा एका काँग्रेस नेत्याच्या मुलाने भाजपात प्रवेश केला आहे. शंभूराजे जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा एकदा भाजपला ट्रोल केले जाऊ लागले आहे.
शंभूराजे यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपाला माढा लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होणार आहे. करमाळा शहर व तालुक्यात जगताप यांची मोठी ताकद आहे. करमाळा नगरपालिका आज त्यांच्याच ताब्यात असून नगराध्यक्षपद जगताप यांच्या दुसऱ्या मुलाकडे (शंभूराजे यांच्या भावाकडे) आहे.
आणखी एका काँग्रेस नेत्याचा मुलगा भाजपात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Mar 2019 07:28 PM (IST)
कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. करमाळ्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मुलानेही भाजपात प्रवेश केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -