शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतील आघाडीच्या पहिल्याच प्रचारसभेत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरातांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वरमध्ये आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते. ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत, असं म्हणत थोरातांनी विखेंना घरचा आहेर दिला. विधानसभेत भाषण झालं का विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात असायचे, असा दावाही थोरातांनी केला.

शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते. ते काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आव्हान देत आहेत, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली.

विखे आणि थोरात यांच्यातील वाद नवीन नाही. सुजय विखेंचा निर्णय वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिलं, हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिलं आहे, असं थोरात म्हणाले होते.

सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मतमतांतरे असतात. मात्र यावेळची निवडणूक विचारधारेची असून आपापसांतील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे, असं थोरात मागच्या वेळी म्हणाले होते.