Praniti Shinde : लोकसभा उमेदवारीच्या नादात आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली. आता बीडचे पार्सल पुन्हा बीडला पाठवा, अशा शब्दात काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांनी राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर टीका केली. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ कासेगाव येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप उमेदवार सातपुते यांच्यावर सडकून टीका करण्यात आली.  


भगीरथ भालके यांचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा


सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचारही आता वेग धरु लागला आहे. आज कासेगाव येथे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेत अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नेत्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर सडकून टीका केली. बीआरएसमध्ये गेलेले नेते भगीरथ भालके यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे याना पाठिंबा दिल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते प्रकाश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली 


आपल्या खुमासदार भाषणात आमदार अमित देशमुख यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर सडकून टीका केली. ते विधिमंडळात होते पण खासदारकीला उभारले आणि आता खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली असा टोला अमित देशमुखांनी लगावला. आता बीडचे हे पार्सल बीडला परत पाठवायची वेळ आल्याचे ते म्हणाले.  


राम सातपुतेंना जबरदस्तीनं उभं केलं


हाच धागा पकडत आमदार सतेज पाटील यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर शेरेबाजी करताना हा जबरदस्तीने उभा केलेला उमेदवार आहे असा टोला लगावला. जो उमेदवार स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सही करायचा विसरतो तो तुमचे भले काय करणार असा टोलाही सतेज पाटलांनी लगावला. ज्याला आपला उमेदवारी अर्ज भरता येत नाही, जो आपल्या अर्जावर सही विसरतो तो तुमच्या भविष्यकाळातील विकासावर काय सही करणार असा सवाल सतेज पाटलांनी केला. ज्याला उमेदवारी अर्ज भरता येत नाही तो आता लाखांच्या बाता करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाटील म्हणाले. आम्ही कोल्हापुरात जसे म्हणतो आमचे ठरलंय तसे सोलापूरकरांनी म्हणा की हे पार्सल बीडला पाठवायचे आहे असा टोलाही सतेज पाटलांनी लगावला. 


महत्वाच्या बातम्या:


राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य