मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसच्या तिकीट वाटपात झालेल्या घोळाची हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घोळामुळे झालेल्या डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीतून तीन महत्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ उद्या मुंबईत येणार आहे. या शिष्टमंडळात संघटन सचिव वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ उद्या राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या तिकीट वाटपात झालेल्या घोळाची हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याची दखल घेत  डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीहून तीन महत्त्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबईत उद्या दाखल होणार आहे.  मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयात उद्या सकाळी दहा वाजता या शिष्टमंडळसोबत बैठक होणार आहे.

देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिकीट वाटप आणि इतर विषयावरुन जे घोळ झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर परिस्थिती ती सावरण्यासाठी, पडझड रोखण्यासाठी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

या बैठकीत काही मतदारसंघातील उमेदवार निवडीवरुन झालेली नाराजी, पक्षातील काही नेत्यांविरोधातील नाराजी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उद्या राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार का? याचीही उत्सुकता आहे.