मुंबई : आघाडीतील पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. बहुप्रतीक्षित पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मोहन जोशी यांना काँग्रेसतर्फे पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर या दोन जागांचा समावेश आहे. रावेरमधील उल्हास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. मात्र पुण्याच्या जागेचा तिढा काही केल्या सुटत नव्हता.
प्रवीण गायकवाड, सुरेखा पुणेकर अशा अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा होती. मात्र अखेर मोहन जोशी यांच्या पारड्यात मत पडलं आहे.
मोहन जोशी यांनी पत्रकारितेतून कारकीर्दीला सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी पुणे युवा काँग्रेस, महाराष्ट्र युवा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आहे. तर 1999 आणि 2004 मध्ये लोकसभेची निवडणूकही लढवली आहे.