पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून सायकंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एकीकडे उन्हाचा कडाका जाणवत असताना दुसरीकडे राजकारणही गरम झालं आहे. त्यातच, महाविकास आघाडीच्या शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवारही चौथ्या टप्प्यात लढत आहेत. शिरुर (Shirur) आणि अहमदनगर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाली लागली आहे. मात्र, पैसेवाटप, बोगस मतदानाचा प्रयत्न आणि दमदाटीच्या आरोपामुळे हे मतदारसंघात राज्यात चर्चेत आले आहेत.
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत, असे ट्विट करत खासदार कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचे म्हटले आहे.कोल्हे यांनी व्हिडिओही ट्विट केला आहे, त्यामध्ये मतदान केंद्रात गोंधळ सुरू असल्याचे दिसून येते. पोलिंग एजंट आणि निवडणूक अधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील संवाद दिसून येत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे, असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.तसेच, आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बुथ परिसरातील घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप बंद करण्याचे तसेच संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत, अशीविनंतीही अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरुन केली आहे.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 4.97 टक्के मतदान झाले आहे. एकूण 11 लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान झाले असून सर्वात कमी मतदान शिरुर मतदारसंघातच झाल्याचं दिसून येत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 14.51 टक्के मतदान झालं आहे. मात्र, दुपारपासून येथील मतदानाचा आकडा वाढेल, असा अंदाज आहे.
कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील
शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. येथील मतदारसंघात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अमोल कोल्हेंनीही दंड थोपटले आहेत. त्यामुळे, या मतदारसंघात सकाळपासूनच कार्यकर्ते मतदानासाठी उत्साहाने कामाला लागले आहेत.
सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
नंदुरबार - २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर - १९.०३ टक्के
जालना - २१.३५ टक्के
औरंगाबाद - १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे - १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड - १६.६२ टक्के