उस्मानाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या प्रांगणात सभेची परवानगी देताना इमारतीची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, आजच्या सभेमुळे शाळेतल्या परीक्षेचं वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे.


विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ आठवडा उरला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील बड्या नेत्यांनीही प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आज तब्बल सात सभा आहेत. त्यापैकी एक सभा उस्मानाबादमध्ये होणार आहे. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पैसे वाचवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन केलं आहे. कळस म्हणजे या सभेसाठी जय्यत तयारी म्हणून शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे.

सध्या या शाळेत सहामाही परीक्षा सुरु आहे. आज पाचवी ते आठवी इयत्तेची चाचणी परीक्षा आहे. तर नववी आणि दहावीचा, गणित, विज्ञान आणि हिंदी विषयाचे पेपर आहेत. प्रशासनाने दबावापोटी परीक्षेचं वेळापत्रक बदलण्यास भाग पाडलं, तरीही परीक्षेची वेळ आणि सभेची वेळ एकच आहे. परीक्षा हॉल आणि उद्धव ठाकरेंचं सभास्थळ यात अवघं दहा फुटांचं अंतर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या ठिकाणची सभा रद्द करणार का, असा प्रश्न आहे.