मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत रविवारी (13 ऑक्टोबर) मुंबईत झालेल्या एका अनौपचारिक बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर दीर्घ चर्चा झाली आणि सौरव गांगुलीच्या नावावर सहमती झाल्याचं कळतं. सी के खन्ना हे सध्या बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष आहेत.

बीसीसीआयची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर आज (14 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

सौरव गांगुली अध्यक्ष बनणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र तो अधिकृतरित्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवडून आला तर त्याचा कार्यकाळ केवळ दहा महिन्यांचा असेल. कारण बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार त्याला पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन वर्षांच्या कूलिंग ऑफ पीरियडमध्ये जावं लागेल. याअंतर्गत गांगुली पुढील तीन वर्ष बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर नियुक्त होऊ शकणार नाही. गांगुलीची नुकतीच सलग दुसऱ्यांदा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.


सौरव गांगुलीने 113 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व केलं असून त्यात 7212 धावा केल्या आहेत. तर 311 एकदिवसीय सामन्यात सौरव गांगुलीने 11,363 धावांचं योगदान दिलं आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारताने 2003 च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती.

सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष असेल, असं आम्ही निश्चित केलं आहे, असं क्रिकेट संघाच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. तर दुसरीकडे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर समजले जाणारे कर्नाटकचे ब्रिजेश पटेल हे आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. सौरव गांगुली आणि ब्रिजेश पटेल यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे पुत्र जय शाह बीसीसीआयचे नवे सचिव बनू शकतात. हिमाचल प्रदेशचे अरुण सिंह ठाकूर खजिनदार बनण्याची शक्यता आहे.