मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र (Teachers Graduate Constituency) वगळता राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Model Code Of Conduct) संपुष्टात आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) ही घोषणा केली आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधरच्या चार जागांसाठी निवडणूक सुरू असून हा भाग वगळता इतर ठिकाणी आचारसंहिता संपुष्टात आल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.


लोकसभेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. ही माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.


राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.


देशात सात टप्प्यात मतदान झालं असून सातवा म्हणजे शेवटचा टप्पा 1 जून रोजी संपला. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होऊन त्याचा निकाल लागला. त्यानंतर आता देशात नवीन सरकार सत्तेत येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. तर 9 जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. 


आचारसंहितेच्या काळात सरकारला कोणताही निर्णय घेता येणार नव्हता. राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने त्यासंबंधी कोणताही निर्णय घ्यायला राज्य सरकारला अडचण येत होती. आता आचारसंहिताच संपल्याने राज्य सरकारला काही महत्त्वाचे निर्णय घेता येणार आहेत.


निवडणूक आचारसंहितेचा नियम काय सांगतो? 


देशात लोकसभा निवडणुका जाहीर होताच, निवडणूक आचारसंहिता लागू होते. तर नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते. या काळात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला. आता येत्या काही दिवसात देशात नवीन सरकार स्थापन होणार आहे. 


नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा


चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीएला समर्थन दिल्याचं पत्र दिल्यानंतर नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


ही बातमी वाचा :