मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सर्वच पक्षांनी कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या सर्व खासदारांना जोमाने कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.


 देशभरासह राज्यातही लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. याचापार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर बैठक पार पडली. शिवसेनेच्या लोकसभेतील 18 खासदारांपैकी अरविंद सावंत, संजय जाधव, राजन विचारे, विनायक राऊत आणि ओमराजे निंबाळकर हे पाच खासदार वगळता इतर सर्व खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील  13 खासदारांच्या या बैठकीत दसरा मेळावा, लोकसभा निवडणूक आणि कॅबिनेट विस्तारावर बैठकीत चर्चा झाली आणि निवडणुकीच्या पूर्वी सर्व खासदारांना आपल्या मतदार संघात भव्य सभा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शन करण्यात आलं.


मतदार संघात भव्य सभा घ्या


 भाजपचं मिशन 45 प्लस, त्यात अजित पवार गटाची  एन्ट्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शासन-प्रशासनावर असलेला वरचष्मा या सगळ्यात जागावाटपात शिंदे गटाला वाटाघाटी करण्याचं मोठं आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा लोकसभा निवडणूक महत्वाची असल्याचे भाजपच्या सर्व आमदारांना सांगण्यात आले आहे. 


आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या  48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यातील लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही 144 मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत.  भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. 


2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं? 


महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 ला 48 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपनं 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे. 


हे ही वाचा: