मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. याचे प्रत्यय सोमवारी मुंबईच्या चांदिवली परिसरात आला. या परिसरातून सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा जात होता. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या कार्यालयाबाहेरुन एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'गद्दार, गद्दार'च्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढलेला पाहायला मिळाला.


नेमकं काय घडलं?


मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतोष कटके यानी काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या. गद्दार घोषणा देणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे हे त्यानंतर संतापले.  संतोष कटके जो कार्यकर्ता होता त्याने काही अपशब्द मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वापरले. त्यामुळे मुख्यमंत्री प्रचंड चिडले. ते गाडीतून रागातच खाली उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात चालत गेले. तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना, 'ऐसा सिखाते हे क्या आप लोग?', अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी जाब विचारला.  यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले. 


संतोष कटके यांचा ठाकरे गटात प्रवेश


संतोष कटके या शिवसैनिकाचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटके यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आज संतोष कटके हे सकाळीच मातोश्रीवर गेले होते. यावेळी संतोष काटके यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संतोष काटके यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी विचारलं की, 'काल कोण होतं शाखेत त्यांनी समोर या'. त्यावर कार्यकर्त्यांनी संतोष कटकेला पुढे केले आणि म्हटले, 'हा होता ज्याने त्यांना 'गद्दार' म्हटलं'. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'शाब्बास!!! हा फोटो मुद्दामून द्या... त्यांच्यापर्यंत जाऊ द्या'.



आणखी वाचा


हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी