मुंबई : पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. पक्ष काही प्रयोग करत असतो. तो पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आहे. कुणाला डावलण्याकरता दुसऱ्यांना संधी दिलेली नाही. कुणालाही खड्यासारखे बाजूला केलेलं नाही. ते पक्षात आहेत आणि पक्षासाठी काम करत राहतील, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.


पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचा आशीर्वाद ज्यांना मिळतो तोच मुख्यमंत्री होतो. मात्र आमचा पक्ष ठरवतो कोण मुख्यमंत्री होणार. मी चांगलं काम केलं आहे म्हणून मलाच मुख्यमंत्री बनवतील असा विश्वास आहे. हे आत्मप्रौढी नाही, असेही ते म्हणाले. सोबतच आम्ही 2014 ला युती घोषित केल्यानंतरच उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेसोबत आमची चर्चा झाली होती. आम्ही उपमुख्यमंत्री देण्यास तयार आहोत असं सांगितलं होतं, मात्र शिवसेनेने कमी कालावधीसाठी नको असं म्हटलं, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी पक्षप्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, आपला शक्तिसंचय झाला पाहिजे. म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. शक्तिसंचय थांबल्याने शक्तीचा ऱ्हास होतो. आज जवळ जवळ सगळेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोडून आलेले नेते पहिले भाजपा आणि दुसरे शिवसेनेला प्राथमिकता देतात. काहींना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. यासाठी आमचे निकष ठरले होते, असे ते म्हणाले.  ज्या जागा आम्ही कधी जिंकलो नाही तिथे जिंकणाऱ्या लोकांना आम्ही घेतलं.  या लोकांना आपण पचवू शकू का? म्हणजे आपल्या धोरणांशी सुसंगत राहतील असे लोक घेतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेला कधी गृहीत धरू नये. जनतेला गृतीत धरलं की जनता तुमचा त्याग करते. स्वतःच्या पलीकडे विचार करत नाहीत असं जनतेला कळलं की जनता नाकारते, असे ते म्हणाले. राजकारणी माणसांकरिता जनता ही टॉनिक असते. जनतेच्या प्रतिसादाची शक्ती मला मिळते म्हणून मी फ्रेश असतो, असेही ते म्हणाले.

यावेळी मित्रपक्षांच्या जागांबाबत ते म्हणाले की, मित्रपक्षांनीच आमचं चिन्ह मागितलं, आम्ही त्यांना दिलं. काही ठिकाणी मित्रपक्षांनी आमचे उमेदवारही नेले. आमचा कुठलाही आग्रह नव्हता की त्यांनी आमच्या चिन्हावर लढावं. मात्र एक चिन्ह आम्हाला मिळत नसल्याने आम्ही कमळाच्या चिन्हावर लढू असे आरपीआयकडून सांगितलं गेलं. जानकरांनी चिन्ह मागितले नाही. मात्र त्यांच्या उमेवारांनी चिन्ह मागून नेलं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या काळातल्या नाहीत. शेतकरी आत्महत्येचं पाप राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं आहे. 15 वर्ष सरकार होत त्यावेळी यांनी काय केलं. ज्या भागात सिंचन आहे तिथं आत्महत्या नाहीत. आम्ही 140 प्रकल्प पूर्ण करू. राज्यातील हे सगळे प्रकल्प आम्ही पूर्ण करण्याचं काम आम्ही सुरु केलं आहे, असे त्यांनी सांगितलं.

आंदोलन केल्यावर हे सरकार लाठ्या मारत नाही हे लक्षात आल्यावर आमच्या काळात आंदोलनं वाढली. आमच्या काळात झालेली आंदोलनं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. आम्ही समस्यांवर तोडगा काढला, म्हणूनच लोकं आम्हाला निवडून देतात, असेही ते म्हणाले.