मुंबई : देशातल्या दुसऱ्या अखंड प्रज्वलित राहणाऱ्या भीमज्योतीचं आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात अनावरण करण्यात आलं. खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते आज सकाळी अखंड भीमज्योतीचं अनावरण झालं. दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहमी मनात तेवत राहावी यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसरात या अखंड ज्योत लावण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली ज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर तीन महिन्यांपूर्वी बसवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता दुसरी अखंड भीमज्योत ही दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात बसवण्यात आली आहे.
महापालिकेने उभारली भीमज्योत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्र्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरोबर बैठका घेऊन हे काम महापालिकेच्या निधीतून करण्याचं ठरवलं. महापालिका वास्तुविशारदांकडून भीमज्योतीचा आराखडा करण्यात आला आणि त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. या भीमज्योतीसाठी महापालिकेला 21 लाख 54 हजार रुपये खर्च आला आहे. तर, चैत्यभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि अन्य बाबींसाठी 42 लाख 74 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
सव्वा आठ फूट उंच साडेसात फूट रुंद भीमज्योत
चैत्यभूमीवरील भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. आठ मिमी काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहिल. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे 24 तास अखंड गॅस पुरवठा केला जाईल. तथागत गौतम बुद्धांचा, 'अत्त दीप भव' म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे.
चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचं अनावरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2019 02:38 PM (IST)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहमी मनात तेवत राहावी यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसरात या अखंड ज्योत लावण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -