वर्धा :  बालाकोटमध्ये हल्ला झाला हे अमेरिका, रशिया, चीन मान्य करतं, पण पाकिस्तान आणि काँग्रेस हे मान्य करीत नाही. काँग्रेस पक्ष हल्ला झाला याचा पुरावा काय? असं विचारत आहे. आधी माहिती असते तर एखाद्या रॉकेटसोबत तुमचा एखादा नेता बांधून पाठवला असता. जा आणि बघून या तिथे कशाप्रकारे हल्ला झाला. भारताच्या सैनिकांवर दोघांनाच संशय आहे, एक पाकिस्तान आणि दुसरं काँग्रेस, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आर्वीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

पूर्वीचं सरकार दहशतवादी हल्ला झाल्यानंतर युएनकडे जायचं आणि पाकिस्तानला रागवायला सांगायचं. ही बाब म्हणजे 'बाजूचा बंडू मला त्रास देतो, बाबा तुम्ही रागावा ना' असा हा प्रकार होता. मोदींनी मात्र जशास तसं उत्तर दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी म्हणतात आम्ही गरीबी हटवू. तुमच्या पणजोबा, आजी, बाबा, आईंनीही गरीबी हटवू, असं सांगितलं. पण गरीबी हटली नाही उलट तर वाढली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मोदींना भ्रष्टाचार संपवायचा आहे. हे म्हणतात आम्ही तो पैसा वाटू. हे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपनेच आहेत, जे पूर्ण होणार नाही, असं ते म्हणाले. कोंबड्या दुप्पट होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याची गोष्ट सांगत राहुल गांधींनी असा कोंबड्यांचा धंदा बंद करावा, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.