Shahu Maharaj : कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारीवरून झालेल्या घडामोडीनंतर छत्रपती घराण्याने राजेश लाटकर यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यानंतर आता कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी सुद्धा आता सक्रियपणे सहभाग घेतला आहे. आज गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची घाटगे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेसाठी खासदार शाहू महाराज सुद्धा उपस्थित राहिले. यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी चांगली टोलेबाजी केली. कागल आणि महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि महाराष्ट्र जनता परिवर्तन नक्की करेल ही शंका नसल्याचेही शाहू महाराज यावेळी म्हणाले.
मी पुरोगामी आहे असं काही जण म्हणत होते
शाहू महाराज म्हणाले की, समरजितसिंह घाटगे कोणतेही पद नसताना सातत्याने काम करत आहेत. त्यांनी अनेक मंजुरी आणल्या आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक केले पाहिजे. शाहू महाराज पुढे म्हणाले की ते स्वतः सीए असल्याने त्यांना गणित चांगलं कळतं. आपल्याला महाराष्ट्र खंडणी मुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. मी पुरोगामी आहे असं काही जण म्हणत होते, मात्र फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सोडून गेले, असा टोला शाहू महाराजांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, आपल्या लाडक्या बहिणींना आपण तीन हजार रुपये देणार आहेत. महाराष्ट्र एक नंबरवर आणायचा आहे, त्यासाठी समरजित घाटगे यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कागलमध्ये लोकसभेला विरोधकाने म्हटलं होते की शाहू महाराजांवर दोन लाखांचे लीड असेल. मात्र, विरोधकांची सगळी गणिते बिघडली, असा टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवारांची चंदगडकरांना साद
दरम्यान, चंदगडमध्येही शरद पवार यांची सभा पार पडली. शरद पवार म्हणाले की, संध्यादेवी यांची इच्छा नसताना आम्ही त्यांना आमदार केलं. आता बाबासाहेब त्यांच्याप्रमाणे वेगानं काम करणारे आणि इथल्या लोकांशी जुळवून घेणारे नेतृत्व नंदाताई यांच्याशिवाय दुसरे कुणी नाही आणि मला खात्री आहे आमची निवड 23 तारखेला योग्य ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंदगडमधील सभेत व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर नंदाताई यांना निवडून द्या, नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नंदाताईच्या पाठीशी उभा रहायचं, असे शरद पवार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या