Chandgad Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur District Assembly Constituency) आमदारकीचा गुलाल नेमका कोणाला लागणार याची उत्सुकता अवघी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे उद्या (20 नोव्हेंबर) चुरशीने सर्वच म्हणजे 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल, यामध्ये शंका नाही. मात्र सर्वाधिक चुरस कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये असणार आहे. त्यामुळे या बहुरंगी लढतीकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा पद्धतीने पाहिले जात असले, तरी जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असल्याने आणि तीन उमेदवारांनी सुद्धा बंडखोरी केली असल्याने नेमकी कोण बाजी मारणार याचे उत्तर शनिवार दुपारपर्यंत मिळणार आहे. 


बंडखोरीमुळे या मतदारसंघामध्ये चुरस वाढली


कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हा दुर्गम भागात विखुरलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर, अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्यामध्ये थेट लढत होत असली, तरी भाजपचे शिवाजी पाटील, काँग्रेसचे आप्पी पाटील आणि जनसुराज्यच्या मानसिंग खोराटे यांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघामध्ये चुरस वाढली आहे. त्यामुळे तीन बंडखोर असल्याने या मतदारसंघांमध्ये कोण कोणाला झटका देणारा कोण कोणाला गुलाल लावण्यासाठी कारणीभूत होणार? याची चर्चा सर्वाधिक रंगली आहे. या मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून सुद्धा जोरदार प्रचार करण्यात आला आहे. शिवाजी पाटील यांनी 2019 मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यांना 50 हजारांवर मते मिळाली होती. गेल्यावेळी राजेश पाटील यांना माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी साथ दिली होती. यंदा कन्या नंदाताईंनीच त्यांना आव्हान दिले आहे.गेल्यावेळी शिवाजी पाटील यांच्यासोबत राहिलेले गोपाळराव पाटील यावेळी अप्पी पाटील यांच्याबरोबर आहेत. संग्राम कुपेकर यावेळी राजेश पाटील यांच्यासोबत आहेत. अप्पी पाटील यांना यावेळी गोपाळराव पाटील, कल्लाप्पा भोगण, प्रभाकर खांडेकर, संपत देसाई, नितीन पाटील यांची साथ आहे.


कुपेकरांचे सामाजिक कामाचे अनुवंशिक गुण नंदाताईमध्ये


संध्यादेवी कुपेकर यांनी आपली लेक कधीच आपल्याला नाराज करणार नाही, कुपेकरांचे सामाजिक कामाचे अनुवंशिक गुण नंदाताईमध्ये असल्याचे म्हटले आहे. आमचे 80 टक्के काम नंदाताई करत होत्या, त्यामुळे स्थानिक कामाचा अनुभव त्यांना असल्याचे त्या म्हणाल्या. मी आज माजी आमदार म्हणून बोलत नाही तर एक आई म्हणून लेकीला संधी देण्याची विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. नंदिनी बाभुळकर यांनी आमदार राजेश पाटील यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे. विकासाच्या नावाखाली शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत गेले. 1600 कोटी रुपयांचा डंका पिटला जात आहे, पण त्यांनी विकास केवळ कंत्राटदार यांचा केला आहे. शरद पवार यांनी मला तुमच्या सारख्या गद्दाराला गाडायला मला आणलं आहे, अशा शब्दात नंदिनी बाभुळकर यांनी आमदार राजेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या