कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. उद्या (20 नोव्हेंबर) मतदान होत असून कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District Assembly Constituency) मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एकूण 3 हजार 452 मतदान केंद्र असणार आहेत. त्या ठिकाणी 33 लाख 5 हजार 98 मतदार मतदान करतील. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये 16,237 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं आहे. 


गृहमतदानात जिल्ह्यात 4 हजार 637 पैकी 4 हजार 430 मतदान


दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी गृहमतदानाला दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. एकूण 4 हजार 637 मतदारांपैकी 4 हजार 430 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाकडून 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत.


विधानसभा संघनिहाय गृह मतदारांची संख्या व  एकूण मतदान 


चंदगड  541 पैकी 513,
राधानगरी 664 पैकी 633,
कागल 738 पैकी 717,
कोल्हापूर दक्षिण 527 पैकी 509,
करवीर 428 पैकी 410,
कोल्हापूर उत्तर 470 पैकी 444,
शाहुवाडी  447 पैकी 422,
हातकणगंले  176 पैकी 169,
इचलकरंजी  229 पैकी 224,
शिरोळ  417 पैकी 389 मतदारांनी मतदान केले. 


कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात महिला सर्वाधिक 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या चार मतदारसंघांमधील महिला कोणाला कौल देणार? याची उत्सुकता असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर आणि शिरोळ या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये महिला कोणाला साथ देणार? याची उत्सुकता आहे.




चंदगड मतदारसंघ महायुतीमध्ये अजित दादांच्या वाटेला असून त्या ठिकाणी विद्यमान आमदार राजेश पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर रिंगणामध्ये आहेत. कागलमध्ये सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शरदचंद्र पवार पक्षाचे समरजीतसिंह घाटगे यांच्यामध्ये तगडा मुकाबला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर अशी लढत होत आहे. शिरोळमध्ये काँग्रेसचे गणपतराव पाटील यांची लढत राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी होत आहे. स्वाभिमानीकडून उल्हास पाटील आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती


1) कोल्हापूर दक्षिण


भाजपचे अमल महाडिक विरुद्ध काँग्रसचे ऋतुराज पाटील 


2) कोल्हापूर उत्तर 


शिवसेना  शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर 


3) करवीर 


काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके


4) हातकणंगले 


काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने 


5) इचलकरंजी 


भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाचे मदन कारंडे


6) शिरोळ 


काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर


7) कागल 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे विरुद्ध अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ  


8)  चंदगड 


अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील


9) राधानगरी 


शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे केपी पाटील विरुद्ध अपक्ष ए. वाय. पाटील


10) शाहुवाडी 


जनसुराज्यचे विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर 


इतर महत्वाच्या बातम्या