औरंगाबाद निवडणूक प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य आता त्यांना चांगलंच भोवण्याच्या  मार्गावर आहे. कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांना तक्रार दिली असून हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात कन्नड पोलीस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख राममहेंद्र डोंगरदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भादवि कलम 188 प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


तीन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी प्रचार सभेदरम्यान उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरले होते. तेव्हापासून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढावून घेतली. या प्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरुद्घ शिवसेनेकडून तक्रार दाखल करण्यात आलीय. औरंगाबादेतल्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नगसेवक राज वैद्य यांनी ही तक्रार केलीय. शिवीगाळ, शिवसैनिकांच्या भावना दुखावणं, जातीय भावना भडकावल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान  16 ऑक्टोबरला हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी हर्षवर्धन जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि घरावर दगडफेक केली. हल्ला झाला त्यावेळी हर्षवर्धन जाधव घरी नव्हते. प्रचारासाठी ते कन्नडमध्ये आहेत. मध्यरात्री तीन ते चार तरुण बाईकवरुन आले आणि त्यांनी गेटबाहेरुन दगडफेक केली. या घटनेत जाधव यांच्या दोन गाड्यांचं नुकसान झालं आहे.

VIDEO | हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला, मध्यरात्री गाड्यांचीही तोडफोड | ABP Majha



शिवसैनिक धडा शिकवणारच : अंबादास दानवे

घरावरील हल्ल्याप्रकरणी अंबादास दानवे म्हणाले की, "हर्षवर्धन जाधवांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी माझ्या कानावर आली. जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये निश्चितच रोष आहे. पण शिवसैनिक असा भ्याड हल्ला करणार नाही. निवडणूक होईपर्यंत संयम बाळगा, असं आम्ही शिवसैनिकांना सांगितलं आहे. स्टंटबाजी करुन सहानुभूती मिळवण्याची सवय हर्षवर्धन जाधवांना झाली आहे. पण शिवसैनिक त्यांना धडा शिकवणार आहेत हे मात्र नक्की."

शिवसैनिकांनीच हल्ला केला : हर्षवर्धन जाधव

माझ्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केला. मला हा हल्ला नामर्दासारखा वाटतो. हल्ला झाला त्यावेळी माझी पत्नी आणि मुलगा असे दोघेच घरात होते. ही निषेधार्ह बाब आहे. मधल्या काळात शिवसेनेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले होते. इतकंच काय तर हर्षवर्धन जाधवांनी स्वत:च्या वडिलांचा खून केला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. परंतु मी संयम बाळगला. परंतु वारंवार आरोप केल्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दलच वक्तव्य केलं.

Assembly Election 2019 | शिवसैनिकांकडून घरावर हल्ला : हर्षवर्धन जाधव | ABP Majha