मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटका बसत असल्याचं पाहायला मिळल्याचं समोर आलं आहे. प्रोटोकॉलमुळे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टरला आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विमानाला उड्डाण घेण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे प्रोटोकॉलच्या नावाखाली मनमानी सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र  हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द केल्यानंतर अमोल कोल्हेंनी अनोख्या पद्धतीने सभेला उपस्थित राहत भाषण देखील केले. भोसरी आणि चिंचवडमध्ये होत असलेल्या या सभेला कोल्हेंनी चांदवड-नाशिक रोडच्या कडेला उभे राहत फोनवरुन संबोधित केले.


याबाबत कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज पिंपरी चिंचवड आणि भोसरी याठिकाणी सभा नियोजित होत्या. परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली. मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे प्राईम मिनिस्टर सर्किटमध्ये नसताना औरंगाबादची परवानगी सुद्धा नाकारण्यात आली. त्यामुळे बाय रोड एरंडोलवरून पुण्याला यायला निघालो. नियोजित सभा अशा कारणामुळे रद्द कराव्या लागल्याची रुखरुख होतीच. चिंचवड आणि भोसरी दोन्ही ठिकाणी सांगितलं की शक्य झाल्यास लाईव्ह स्क्रिंनिंग करू, परंतु डिजिटल इंडियाच्या दैदिप्यमान यशामुळे शक्य झालं नाही. तरीही चिंचवड आणि भोसरीच्या मायबाप मतदारांना संबोधित केलं.. समोर श्रोते नसताना एक सभा अशीही झाली रस्त्याच्या कडेला...वक्ता चांदवड नाशिक येथे आणि मायबाप मतदार भोसरी आणि चिंचवडमध्ये! अडचणी जेवढ्या अधिक तेवढी संघर्षाला धार अधिक आणि संघर्ष जेवढा अधिक तेवढी यशाची झळाळी अधिक, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.


पंतप्रधान मोदी  यांची सभा पुण्यात असल्याचे फ्लाईंग परमिशन नाकारण्यात आली. जर देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या प्रचारासाठी येत असतील तर तो प्रोटोकॉल धरून इतर पक्षाच्या नेत्यांना प्रचारापासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे? असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.