अहमदनगर : एकीकडे निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष आधुनिक तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी जादूटोणा केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.


अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकात जादूटोण्याचा प्रकार उघड झाला आहे. याठिकाणी विकासाचे मुद्दे बाजूला सारत निवडणूक थेट अंधश्रद्धेच्या बाजरात जाऊन बसली आहे. पटवर्धन चौकातील मुख्य रस्त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रचार पत्रकावर अंडे, मांस, दोन काळ्या बाहुल्या, लिंबू, हळद-कुंकू हे साहित्य आढळल्याने खळबळ माजली आहे. घटनेमुळे शहरात प्रचारापेक्षा याच गोष्टीची चर्चा जास्त रंगत आहे.


जादूटोण्याचे हे साहित्य पाहून अनेकजण आपापल्या परीने तर्क-वितर्क लावत आहेत. दोन बाहुल्या असल्याने चारपैकी दोन उमेदवारांवर जादूटोणा करण्यात आला आहे, अशा चर्चा  रंगू लागल्या आहेत.


मात्र सगळा प्रकार विरोधकांचा डाव असल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आरोप केला जात आहे. तर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा गोष्टींना सोशल मीडियावर थारा देऊ नये, असं सांगत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा निषेध केला आहे.