भाजपची मेगाभरती; काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आधी मुलांचा मग पित्यांचा प्रवेश?
विरोधी पक्षातील विशेषत: राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज मंडळी भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची विधानं भाजप नेते वारंवार करत आहेत. त्यातच आम्ही आधी नेत्यांच्या मुलांना घेतो, मग नेते आपोआप येतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात म्हणाले होते. अशाच काही मोठमोठ्या नेत्यांच्या मुलांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासाठी 10 ऑगस्टचा मुहूर्त ठरला आहे. या मेगाभरतीत प्रामुख्याने, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नेते किंवा त्यांच्या मुलांचा समावेश असेल. मात्र पक्षश्रेष्ठींकडून याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. येत्या काही दिवसात त्यावर निर्णय होईल. त्यामुळे आता 10 ऑगस्टच्या मेगाभरतीत कोणते चेहरे घड्याळ आणि पंजाची हात सोडून कमळ हाती घेतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते भाजपमध्ये
मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव पिचड, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये दाखल झाले. याशिवाय राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक, महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले तसंच माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
संबंधित बातम्या
'भाजपात प्रवेश देणे आहे', भाजपच्या मेगाभरतीची खिल्ली उडवत बॅनरबाजी
माझा कट्टा | विधानसभा निवडणुकीत आघाडीचे केवळ 40 आमदार निवडून येतील : गिरीश महाजन
विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार : मुख्यमंत्री