BJP Star Campaigners In Gujarat : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी भाजपनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपकडून 40 स्टार प्रचाराकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. 40 स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इरानी, शिवराज सिंह, रवी किशन, मनोज तिवारी, हेमा मालिनी,  परेश रावल, विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे.


या नेत्यांशिवाय भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावाचा समावेश आहे. त्याशिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पेटल यांच्या नावाचाही समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी गुजरात निवडणूक लढण्यास नकार दिला होता. कलाकारांमध्ये अभिनेता परेश रावल याच्याशिवाय भोजपुरी गायक आणि खासदार मनोज तिवारी, अभिनेता रवी किशन आणि गायक दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्या नावाचाही समावेश आहे.



उमेदवारांच्या नावावर नाराजी - 
182 सदस्य असणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. त्यासाठी भाजपनं 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या नावावरुन काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं आहे. काही नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केले आहे. भाजपकडून 22 उमेदारांची घोषणा करणं अद्याप बाकी आहे. वडोदरामधील वाघोड़िया विधानसभा जागांवर विद्यमान आमदार मधु श्रीवास्तव यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पक्षाकडून या जागेवार अश्विन पटेल यांना तिकीट दिलेय.   


38 नव्या चेहऱ्यांना संधी -
गुजरात उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपनं 38 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहे. तर 69 जणांना पुन्हा संधी दिली आहे. म्हणजेच पहिल्या यादीमध्ये भाजपनं 38 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 


दोन टप्प्यात मतदान - 
गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.