मुंबई : मागील वर्षी म्हणजे 2022 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election) भाजपने विरोधकांना धूळ चारत दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपने (BJP) किती पैसा खर्च केला होता हे आता उघड झालं आहे. या खर्चाचा संपूर्ण हिशेब पक्षाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर केला आहे.


प्रचार आणि उमेदवारांच्या निधीवर 209.97 कोटी खर्च


गुजरातमध्ये 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सत्तेत असलेल्या भाजपने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 209 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा खर्च केला आहे. पक्षाने ही माहिती निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तपशीलात दिली आहे. संबंधित खर्चाचा अहवाल गुरुवारी (17 ऑगस्ट) निवडणूक समितीकडून सार्वजनिक करण्यात आला. 


पक्षाने 15 जुलै रोजी गुजरात निवडणुकीवरील मुख्य निवडणूक खर्चाच्या अहवाल सादर केला. त्यानुसार, पक्षाच्या प्रचारासाठी आणि उमेदवारांच्या निधीवर 209.97 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 


प्रचारासाठी सर्वाधिक रक्कम खर्च


पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना सुमारे 41 कोटी रुपये दिले आणि विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासह प्रवास खर्चासाठी 15 कोटी रुपये खर्च केले. पक्षाने सर्वसाधारण प्रचारावर 160.62 कोटी रुपये खर्च केले, असं या अहवालात म्हटलं आहे.


भाजपचा एकतर्फी विजय


दरम्यान मागील वर्षी डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये भाजपने जबरदस्त विजय मिळवून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. पक्षाने राज्याच्या 182 पैकी 156 जागांवर दणदणीत विजय मिळवत सर्व विक्रम मोडित काढले होते. इथे विरोधी पक्ष काँग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं.


लोकसभा निवडणुकीवर नजर


विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पक्षाने 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 26 मतदारसंघांता विजय मिळवला होता. आता 2024 मध्येही हाच फॉर्म कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.


हेही वाचा


Gujarat Assembly Election Winning Candidate List: गुजरात विधानसभा निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांची फुल अँड फायनल यादी