मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज झाल्यानंतर एक्झिट पोलमधून (Exit Poll) निवडणूक निकालांचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार, देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातही महायुतीला (mahayuti) सर्वाधिक जागा मिळणार आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटणार असल्याचं दिसून येत आहे. अब की बार, 400 पारचा नारा देणाऱ्या भाजप आघाडीला लोकसभा निवडणुकीत 400 पारचा आकडा गाठता आला नाही. मात्र, भाजपप्रणित एनडीए आघाडीने 350 पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला देशात 353 ते 383 जागांवर आघाडी आहे. तर, इंडिया आघाडीला 152 ते 182 जागांवर आघाडी मिळेल, असा अंदाज आहे. तसेच, रिपब्लिक टीव्हीच्या (Republic) एक्झिट पोलनुसारही महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटणार असून महायुतीला 29 जागांवर यश मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे, गतवेळेस भाजप महायुतीच्या 42 जागा होत्या. मात्र, यंदा भाजप महायुतीला 29 जागा मिळतील असा अंदाज पाहायला मिळतो. तर, देशात भाजप आघाडीचं साडे तीनशे पार होणार असल्याचं दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांवर आघाडी आहे. विशेष म्हणजे 1 जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असून सांगलीतील जागेवर अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच, रिपब्लिक MPARQ च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतील 29 जागांवर आघाडी मिळत असून महाविकास आघाडाली 17 जागांवर आघाडीचा अंदाज आहे. तर, रिपब्लिक Matriz च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 30 ते 36 जागांवर आघाडी असल्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला 13 ते 19 जागा मिळू शकतात, असा अंदाज या पोलमधून पाहायला मिळत आहे.
रिपब्लिक MPARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात भाजप प्रणित एनडीए आघाडीला 353 ते 368 जागांवर आघाडी मिळण्याचा अंदाज आहे. तर, इंडिया आघाडीला केवळ 118 ते 133 जागांवर आघाडी मिळणार असल्याचे दिसून येते. तसेच, इतरमध्ये 43 ते 48 जागांचा अंदाज पाहायला मिळतो.
रिपब्लिक Matriz च्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपप्रणित एनडीए आघाडीला 359 जागांवर आघाडी आहे. तर, इंडिया आघाडीला 154 जागांवर आघाडी मिळू शकते. इतरमध्ये 30 जागा दर्शवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, रिपब्लिकच्या दोन्ही एक्झिट पोलचा अंदाज लक्षात घेता केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसून येत आहे. तर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाढतील असा अंदाज आहे. गत 2019 च्या तुलनेत भाजप महायुतीच्या 10 ते 12 जागा घटणार आहेत.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
हेही वाचा
Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.