शिर्डी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे खासदार सुजय विखे- पाटील यांची सभा पार पडली. यावेळी सुजय विखे-पाटलांनी राष्ट्रवादी आणि बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केली. विखेंच्या या सभेत 300 युवकांनी महायुतीत प्रवेश केला.
मी म्हणणार नाही विकास पहायला गुजरातला जा. दोन मतदारसंघ शेजारी आहेत माझ्या वडिलांचा आणि तुमचा (संगमनेर). आधी आम्ही एकाच पक्षात होतो, मात्र मी सत्ताधारी पक्षात आलो. माझे वडील मंत्री झाले. याच सर्व श्रेय बाळासाहेब थोरात यांना जातं. लोकसभेत तिकीट वाटपावरुन जो गोंधळ झाला त्यामुळे मला मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरांतांचा फोटो माझ्या घरात लावणार आहे, असा टोला सुजय विखेंनी लगावला.
राष्ट्रवादीने नेते दोन वर्षांनी येरवडा जेलमध्ये भेटतील
मला लोकसभेला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, याचं कारण मी सुशिक्षित आहे, माझ्यावर एकही केस नाही. राष्ट्रवादीमध्ये सगळे वाळू तस्कर, डाकू यात माझ्यासारख्याचं काय काम आहे. म्हणून मला उमेदवारी दिली नसेल. मात्र यांच्या पक्षातील नेत्यांना दोन वर्षानंतर भेटण्याचं ठिकाण संपर्क कार्यालय नव्हे तर येरवडा जेल असेल. ईडीची केस झाली तर यांच्या डोळ्यात पाणी आलं, अशी टीका अजित पवार यांचं नाव न घेता केली. हे पाणी कधी जनतेसाठी का नाही आलं, असा सवाल सुजय विखेंनी विचारला.
राष्ट्रवादीवाले म्हणतात वातावरण बदललं आहे. आमच्या सभांना जास्त गर्दी आहे. कोणाच्या तर अमोल कोल्हेच्या सभेला गर्दी आहे. तीन महिन्यांत अमोल कोल्हे शेतकरी झाला. कांदा, सोयाबीन, ऊस सगळं यांना समजलं.
मग आम्ही काय तीन वर्षांपासून शेतकरी नाही का? निवडणूक झाल्यावर मी देखील एक मालिका काढणार असल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला.