मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकवलीमध्ये जाऊन राणे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर गप्प बसतील ते राणे कसले. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर लगेचच नारायण राणेंचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी नाव न घेतला ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.


"चार हाडांचा बीएमची चोर, आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू", असं म्हणत निलेश राणेंनी नाव न घेता इशारा दिला. तर नारायण राणे यांनाही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर विचारण्यात आलं, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर उत्तर देईल. नारायण राणे टीका सहन करणाऱ्यापैकी नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला राणे कसं उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.





नितेश राणे कणकवली मतदारसंघातील युतीचे उमेदवार आहेत. मात्र शिवसेनेने त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे शिवसेनेने युती धर्म पाळला नसला तरी आम्ही शिवसेनेवर काहीही टीका करणार नाही. मुख्यमंत्र्यांना दिलेले शब्द आम्ही पाळणार, अशी मवाळ भूमिका नितेश राणे यांनी घेतली आहे.



काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

नारायण राणे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर, पाठीत वार करणाऱ्या औलादींपासून सावध राहा, असा मित्रत्वाचा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला. भाजप-शिवसेनेची युती आहे, मात्र तरीही कणकवलीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार उभा केला आहे. भाजपने इतर कुणाला उमेदवारी दिली असती, तर मी त्याचं समर्थन केलं असतं. मात्र याचा अर्थ आमच्यामध्ये काही मतभेद आहेत, असा होत नाही.


नारायण राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. चोर मित्राच्या घरात शिरत असताना मी शांत कसा बसू शकतो. कारण पाठीत वार करणारे माझ्या मित्रपक्षांकडेही नकोत, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. मान वाकवणारा स्वाभिमान काय कामाचा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीकास्त्र सोडलं.




संबंधित बातम्या