मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांच्या पाया पडून गळाभेट घेतली. मनोज माझ्या धाकट्या भावासारखा असून त्याच्या विजयाची जबाबदारी आपली असल्याचं यावेळी सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्यांच्या आशीर्वादाने ही सीट निवडून आणू, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला. ईशान्य मुंबईची जागा देशभरात टॉप 10 मध्ये आणू, असं सांगतानाच किरीटजी आपल्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांची विकासकामं त्यांच्याच आशीर्वादाने पुढे नेऊ, असंही ते म्हणाले.
मनोज कोटक हा डायनॅमिक उमेदवार असून टॉप दहा निकालात त्यांचा निकाल लागेल. आज आनंदाचा दिवस आहे त्यामुळे कोणावर नाराजी वगैरे नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी व्यक्त केली.
VIDEO | ईशान्य मुंबईतून भाजपकडून उमेदवारी मिळवणारे मनोज कोटक कोण आहेत? | एबीपी माझा
पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी चांगल्याप्रकारे निभावली. मला कुठल्याही गोष्टीचं दुःख नाही. पक्षाने दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, असंही सोमय्या म्हणाले. पक्षाने मला सर्व काही दिलं, पक्षासाठी काही गमवावं लागलं, तर त्याची खंत नसेल, असंही सोमय्या यांनी व्यक्त केला.
'नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जे-जे करावं लागेल, ते करणार. देशाला काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दूर ठेवण्यासाठी जे-जे करावं लागेल, ते करणार' असाही निर्धार सोमय्या यांनी सांगितलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर जाण्याचा प्रयत्न केला नाही, मीडियामध्ये पसरलेलं वृत्त खोटं आहे, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्यांना भोवल्याचं म्हटलं जात आहे.
मनोज कोटक यांचा परिचय
मुंबईत भाजपचे मुलुंड मधील विद्यमान नगरसेवक
मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते
मनोज कोटक यांनी 2014 साली भांडुप विधानसभेतून निवडणूक लढवली होती
मनोज कोटक मुलुंडचेच रहिवासी असल्यामुळे किरीट सोमय्या यांना मुलुंड मध्येच आव्हान उभं ठाकलं
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांच्या उमेदवारीस स्थानिक शिवसेनेचं समर्थन