औरंगाबाद/मुंबई : "भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्मऐवजी जावई धर्म पाळला," अशा आरोप शिवसेनेचे औरंगाबादमधील खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी काल (2 मे) 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेना-भाजप युती झाली. मात्र निकालाआधीच दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं आहे. चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांमुळे युतीच्या नव्या संसारात पहिला खडा पडल्याचं चित्र आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे हे भाजप-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरीही रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात उतरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना रोखलं नाही. जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी दानवेंविरुद्ध निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांनी अर्जुन खोतकर यांची समजूत काढून त्यांना बंडखोरीपासून रोखंलं. मात्र दानवेंनी या सहकार्याची जाणीव ठेवली नाही आणि जावयालाही आवरलं नाही, अशी तक्रार चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

"रावसाहेब दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादमधील भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं काम केलं. जाधव यांनी खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना आवरा," असं अमित शाहांकडे केलेल्यात तक्रारीत खैरेंनी म्हटलं आहे.