भोपाळ : भाजपने लोकसभा निवडणुकीतील आणखी 22 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेशातील चार उमेदवारांचा समावेश आहे. भाजप मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे.


साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भोपाळ मतदार संघात भाजप गेल्या 30 वर्षापासून अजिंक्य आहे.

याशिवाय मध्य प्रदेशात गुना मतदार संघातून डॉ. के. पी. यादव यांना काँग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. तर सागर मतदार संघातून राज बहादूनर सिंह आणि विदिशा मतदार संघातून रमाकांत भार्गव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दिग्विजय सिंह यांचं नाव समोर आल्यानंतर भाजप प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावाचा विचार करत होती. तर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही जर संधी मिळाली तर दिग्विजय सिंह यांच्याविरोधात लढण्याची तयारी दर्शवली होती. साध्वी यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना देशद्रोही देखील म्हटलं आहे.

2014 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आलोक संजार यांना याठिकाणी 7 लाख 14 हजार 178 मते मिळाली होती. तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसचे पीसी शर्मा यांना 3 लाख 43 हजार 482 मते मिळाली होती. त्यामुळे भाजपचा गड असेलेल्या मतदारसंघात प्रज्ञा सिंह ठाकूर  ही जागा राखणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.