पिंपरी, मंचर : पुण्यात पिंपरी आणि मंचरमध्ये गारांचा पाऊस झाला. पुणे जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मंचरमध्ये काल पडलेल्या गारांमुळे कांद्याच्या शेतीचं आणि कच्च्या आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळपासून आभाळ गच्च भरलं होतं. संध्याकाळी गारपीटीसह पावसाने हजेरी लावली. मावळ तालुक्यातही कांदा आणि गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
नाशिक : मागील तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात येवला आणि मनमाड परिसरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळं कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच डाळिंबाच्या बागांनादेखील मोठा फटका बसला आहे.
वाशिम : वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे आंबा, संत्री, कांदा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी गारादेखील पडल्या आहेत.
पुणे, सातारा : मागली दोन-तीन दिवसांत पुण्यात शिवाजीनगर भागात मुसळधार पाऊस झाला आहे. सणसवाडी परिसरात गारांचा पाऊस झाला. तर साताऱ्यातही सारखीच परिस्थिती होती. साताऱ्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि पाटण भागात गारांचा पाऊस झाला. विशेष म्हणजे साताऱ्यातील दुष्काळी भाग खटावमध्येदेखील गारांसह पाऊस पडला.
जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. काल रात्री जळगाव जिल्ह्यातील चोपडा, भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील केळी जमीनदोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
VIDEO | वादळी पावसामुळे देशभरात 35 लोकांचा मृत्यू | एबीपी माझा