Maharashtra Assembly Election 2024 पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या (Shiv Sena UBT) वतीने संभाजी ब्रिगेडला (Sambhaji Brigade) विश्वासात घेतले नाही, त्यामुळे ही युती आता तुटली असून राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. तसेच राज्यात 50 पेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी दिली आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, गंगाधर बनबरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकी संभाजी ब्रिगेड राज्यातील 50 हून अधिक मतदारसंघात उमेदवार देत ही लढत अधिक चुरशीची करण्याच्या तयारीत आहे.
सन्मानपूर्वक स्थान आणि आश्वासनानुसार जागा न दिल्याचा आरोप
दोन वर्षापूर्वी शिवसेनेबरोबर संभाजी ब्रिगेडची युती झाली होती. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचा प्रचार केला. दरम्यान, महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विधानसभेच्या जागा वाटपात आम्हाला सन्मानपूर्वक स्थान आणि आश्वासनानुसार जागा न दिल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
विधानसभेला 50 मतदारसंघात उमेदवार देणार- डॉ.शिवानंद भानुसे
शिवसेना (उबाठा) बरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडत आहोत. जात, धर्म, फॅसिस्ट शक्तींना संभाजी ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहिला असून तो कायम राहील. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लोकांचे प्रश्न, महामानवांचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. सुमारे 50 जागावर आमचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. महायुतीची सनातन विषमता आणि आघाडीचे नकली पुरोगामीत्व या विरोधात समाजमत तयार करण्याची गरज असल्याचेही डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगें यांच्यबरोबर जाणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाकडून आता नेमकं कोणाला उमेदवार म्हणून जाहीर केलं जाईल हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
हे ही वाचा