मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती होत असून मनसे विरुद्ध शिवसेना असा सामनाही रंगणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, मनसेनं 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, त्यामध्ये वरळी मतदारसंघातून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. वरळी मतदारसंघातून गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरेंनी प्रथमच राजकारणात एंट्री केली होती. ठाकरे कुटुंबातील पहिलाच उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या रुपाने विधानसभेच्या निवडणुकांत उतरला होता. त्यामुळे, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नात्यांची जपणूक करत, आदित्य ठाकरेंविरुद्ध उमेदवार दिला नाही. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंचा मोठा मताधिक्याने विजय झाला होता. मात्र, यंदा नात्यापेक्षा पक्षीय राजकारणाला राज ठाकरेंनी प्राधान्य दिल्याचे पाहायाला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानेही अमित ठाकरेंविरुद्ध उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यावरुन, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भूमिकेवर व माहिम मतदारसंघातील लढतीवर भाष्य केलंय. 


मुंबईतील वरळी आणि माहीम मतदारसंघात अप्रत्यक्षपणे ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. कारण, मनसेनं वरळी मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करत संदीप देशपांडेंना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, आदित्य ठाकरेंना पु्न्हा एकदा वरळीतून संधी दिल्यास येथे शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध मनसे राज ठाकरे असा सामना होईल. तर, माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेनं राजपुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे येथेही अमित ठाकरे विरुद्ध शिवसेना ठाकरेंचा उमेदवार असल्याने ठाकरे विरुद्ध ठाकरे अशीच अप्रत्यक्ष लढत होत आहे. त्यामुळे, या दोन्ही लढतीवरुन आता टीका टिपण्णी व राजकीय भाष्य केलं जात आहे. कारण, गत 2019 च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळी मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता. 


उद्धव ठाकरेंनी नातं जपलं नाही


राज ठाकरेंनी नातं जपलं होतं, आपला पुतण्या पहिल्यांदा उभा राहिला तर त्यांनी उमेदवार दिला नव्हता. मात्र, उद्धव ठाकरेंनी नातं जपलं नाही, मराठी माणसाला जपलं नाही, भावाला जपलं नाही, फक्त खुर्ची खुर्ची आणि खुर्ची असं ते करत आले आहेत, अशा शब्दात आमदार किरण पावकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. माहीम मतदारसंघात उमेदवार देऊन उद्धव ठाकरेंनी भावाच्या मदतीची परतफेड केलीय, असा टोला किरण पावसकर यांनी लगावला.


कर्नाटक, तेलंगणा बॉर्डर सील करा - 


महायुतीकडून 182 लोकांची यादी आम्ही पुढे ठेवली, मविआकडून अजून काय आलंय ते तुम्हाला माहिती आहे. मला वाटते, नाना पटोले यांना बाजूला ठेवून बाळासाहेब थोरात यांच्याकडे अधिकार सोपवल्याचे दिसत आहेत. जनतेचे प्रश्न बाजूला ठवून फक्त खुर्ची डोळ्यासमोर ठेवून राजकारण चाललंय. नाना पटोले यांना न्याय कोण देणार, असे पावसकर यांनी म्हटलं. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि तेलंगणा बॉर्डर सील करा, आम्ही निवडणूक आयोगाकडे ही मागणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 


हेही वाचा


Amit Shah: महायुतीत तिकीट कापलं, नाराज माजी आमदाराने दिल्ली गाठलं; अमित शाहांची मध्यस्थी