2014 च्या लोकसभा निवडणुकीत असलेली युती आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युतीचं बिनसलेलं गणित यांमुळे शिवसैनिकांनी करो या मरो ची लढत देत या मतदारसंघावर आपले अस्तित्व सिद्ध केले. शिवसेनेचे शांताराम मोरे हे 2014 च्या निवडणुकीत 57 हजार 082 मते मिळवून 9 हजार 160 च्या मताधिक्याने या निवडणुकीत निवडून आमदार झाले. त्यावेळी भाजपचे शांताराम पाटील यांनी देखील सेनेला कडवी टक्कर दिली होती मात्र त्यांना 47 हजार 922 मतांवर समाधान मानावे लागले . तब्बल 25 वर्ष भाजपचे अधिराज्य व वर्चस्व असलेला हा मतदार संघ शिवसैनिकांनी जिकरीचे लढाई देत आपल्याकडे खेचून घेतला. तर दुसरीकडे 25 वर्षांपासून या मतदार संघावर मजबूत पकड ठेवणारे भाजप आमदार व माजी मंत्री विष्णू सावरा यांना जिल्हा विभाजनामुळे पालघरच्या विक्रमगड विधानसभेतून उमेदवारी मिळाल्याने निवडणुकीच्या काळात त्यांना भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाकडे लक्ष देता आले नाही त्याचाही फायदा शिवसेनेला झाला. एकंदरीतच जिल्ह्याचे विभाजन आणि त्यातून सावरांचा बदललेला विधानसभा मतदारक्षेत्र आणि तुटलेली युती याचा फायदा शिवसेनेला आपसूकच झाला.
भिवंडी ग्रामीणचे तब्बल 25 वर्ष आमदार राहिलेले विष्णू सावरा यांना विक्रमगडसारख्या नवख्या मतदार संघात निवडणूक लढण्याचे आव्हान होते. मात्र राजकीय अनुभवावर सावरांनी युती नसतांनाही विभक्त लढत आपल्या व भाजपच्या विजयाची परंपरा तेथेही कायम ठेवली आणि या मतदार संघातूनही विजयाची माळ आपल्या गळ्यात पडून घेतली. सहाव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकल्याने विष्णू सावरा यांची थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली होती. दुसरीकडे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांनी भरभरून मतदान केल्याने अनेक ठिकाणी भाजप सेनेचे लोकसभा उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना भाजपने हि निवडणूक विभक्त लढली. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना साथ देऊनही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात थेट सेनेवर ताशेरे ओढणाऱ्या भाजपच्या पक्षश्रेष्ठीना भिवंडी ग्रामीण मतदार संघातील शिवसेनेची ताकद दिसावी यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत आपल्या उमेदवाराला निवडणुकीत निवडून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने शांताराम मोरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिल्याने भाजपच्या वर्चस्वाखाली असलेला हा मतदार संघ शिवसेनेने आपल्या कडे खेचून घेतला. 2014 च्या निवडणुकीनंतर बिनसलेल्या युतीमुळे शिवसेनेने या ग्रामीण मतदार संघात आपली पकड मजबूत करत पुढे ग्रामपंचायत निवडणुकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती , जिल्हा परिषद, व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
यावेळी मात्र या विधानसभा मतदार संघाची गणित बदलली आहेत. सेना भाजपच्या युतीची शक्यता वाढल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण युती झाली तर हा मतदारसंघ पुन्हा सेनेच्या वाट्याला असणार आहे. आणि मागील पाच वर्षात सेनेने या मतदार संघात केलेली कामे व पक्षाची वाढलेली ताकद याचा निश्चितच फायदा या निवडणुकीत होणार आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपली रणनीती आखायला सुरुवात केली असून या मतदार संघासाठी उमेदवारांच्या चाचपणी साठी पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये भाजपचे महादेव घाटाळ, दशरथ पाटील, शांताराम पाटील, संतोष जाधव, वाड्याचे भाजप कार्यकर्ते डॉ हिरवे, भाजप कार्यकर्ते गौंड अशा भाजप कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. तर शिवसेनेचे शांताराम मोरे यांनीही आपली पूर्ण तयारी ठेवली आहे.
विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत असलेल्या कपिल पाटील यांनी भाजप प्रवेश करून खासदारकीची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. खासदार कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशापासून राष्ट्रवादीची झालेली वाताहत आजही सुरूच आहे. त्यामुळे एकेकाळी सेना भाजप सारख्या मातब्बर पक्षाला टक्कर देणारी राष्ट्रवादी कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भिवंडी ग्रामीण मतदार संघात कमजोर झाली आहे. त्यातच सलग दोनदा भाजपचे खासदार झालेल्या कपिल पाटलांनी विष्णू सावरा यांची कमी भरून काढण्याचे काम करत या मतदार संघात भाजपला मजबूत करण्याचे काम देखील केले आहे. विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजपा विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांना भाजपा मध्ये खेचण्याचे महत्वाचे काम खासदार कपिल पाटील यांनी केले असून या मतदार संघात भाजपनेही वर्चस्व स्थापित केले आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीचे गणित पाहता शिवसेनेचे शांताराम मोरे यांना 57 हजार 082 मते , भाजपचे शांताराम पाटील यांना 47 हजार 922 मते , मनसेचे दशरथ पाटील यांना 25 हजार 580 मते , राष्ट्रवादीचे महादेव घाटाळ यांना 23 हजार 413 मते , काँग्रेसचे सचिन शिंडगा यांना 10 हजार 923 मते मिळाली होती. मात्र सध्या राष्ट्रवादीचे महादेव घाटाळ व मनसेचे दशरथ पाटील हे भाजपमध्ये आल्याने या मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. तर सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झालेली वाताहत याचा दुहेरी फायदाही भाजपला होत आहे. त्यामुळे या मतदार संघावर भाजपनेही आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजकीय डावपेच आखले आहेत मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीच्या सेटलमेंटमध्ये आणि दिलेल्या शब्दामुळे राजकीय ताकद वाढवूनही भाजपला या मतदार संघावर पाणी फेरावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला दुसऱ्यांदा विजयाची संधी निश्चितच मिळणार आहे मात्र त्यासाठी युती फॅक्टर महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.
२००९ भिवंडी ग्रामीण विधानसभा
१) विष्णु सावरा - भाजप - ४६९९६ (विजयी)
२) शांताराम पाटील - राष्ट्रवादी - ४४८०४ ३) दशरथ पाटील - मनसे - ३६६८७
------------------------------ ------------------------------ --
एकूण मतदान - १३५५३८ टक्के - ५६.०० %
२०१४ भिवंडी ग्रामीण विधानसभा
------------------------------ ------------------------------ ---
१) शांताराम मोरे - सेना - ५७०८२ (विजयी)
२) शांताराम पाटील - भाजप - ४७९२२ ३) दशरथ पाटील - मनसे - २५५८०
------------------------------ ------------------------------ --
एकूण मतदान - १७३७५८ टक्के - ६६.०० %