मुंबई : बाळासाहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा घेतला. शिवसेनेचे सर्व 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यासाठी हजर होते. मात्र 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना बोलावलं म्हणजे युती तुटली, असं होत नाही असं उद्धव ठाकरे सांगायला विसरले नाहीत. तसेच


महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही


महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः शिवसेनाप्रमुखांना हातात हात घेऊन वचन दिले आहे की एक न एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत मला सत्ता पाहिजे आहे, त्यामुळे सगळ्या 288 जागांवरच्या इच्छुकांना मी बोलावलं. गेल्या पाच वर्षात आपण जे काही काम केलं आहे, त्याबद्दल धन्यवाद द्यायला बोलावले आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही, मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे. युती आज-उद्या जाहीर होणार आहे. माझं आणि अमित शाह यांच्यात सकारात्मक चर्चा सुरु आहे. दोस्ती केली तर मनापासून करणार, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.


शिवसेनेच्या या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पवारांच्या कौटुंबिक कलहात रस नसल्याचं सांगितलं. शिवाय सूड उगवणाऱ्यांवर महाराष्ट्र आसूड ओढतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हा महाराष्ट्र आहे, सुडाचे राजकारण कधीच सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडाने वागणार नाही. शिवसेनेशी वाईट वागले, त्यांचे मी वाईट कधीच चिंतित नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.