Bhaskar Jadhav मुंबई : हिंदुत्वाचा मुद्दा हा शिवसेनेचा आधीपासून राहिलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून शिवसेना बाजूला झालेली नाही, उलट हाच हिंदुत्वाचा मुद्दा इतर लोकांनी चोरला आहे. समाजवादी पक्ष फक्त शिवसेनेच्या हिंदुत्वादाच्या मुद्द्यामुळे बाजूला जात असेल तर मी स्पष्ट सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही. असे परखड मत व्यक्त करत अबु आझमी (MLA Abu Azmi) यांनी मविआतून(Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याच्या निर्णयावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाष्य केलंय.
समाजवादीने आमच्या सोबत राहावं, अशी आमची इच्छा- भास्कर जाधव
उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आदेश शिवसैनिकांना दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी प्रचंड नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अबु आझमी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत मविआने घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षासाठी जागा सोडल्या होत्या. सपाचे अबु आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, शनिवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले.
तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील, असे स्पष्ट संकेत मिळले आहेत. यावर भाष्य करताना शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही. असे परखड मत व्यक्त केले आहे. तसेच उद्धव ठाकरे हे अखिलेश यादव सोबत बोलले की नाही हे माहित नाही. मात्र समाजवादी पक्षाने आमच्या सोबत राहावं, अशी आमची इच्छा असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले.
विरोधी पक्ष नेते पद दिले जाईल, असा विश्वास- भास्कर जाधव
विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावा, यासाठी महाविकास आघाडी एकत्रित मिळून प्रयत्न करेल. विधानसभा अध्यक्ष निवडल्यानंतर तातडीने आम्ही प्रयत्न करू. आम्हाला विश्वास आहे की आम्हाला विरोधी पक्ष नेते पद दिले जाईल, असेही भास्कर जाधव म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या