मुंबई : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकल्या आहेत. सेनेच्या आमदारांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत भास्कर जाधव यांची विधानसभेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली. तर, सुनील प्रभू पुन्हा एकदा पक्षाचे प्रतोद बनले आहेत. तर, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
भास्कर जाधव काय म्हणाले?
राज्यात पहिल्यांदाच एवढा मोठा संख्येने सत्ताधारी झाले आहेत.विरोधी पक्ष संख्येने छोटा झाला आहे तरी पण हा विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना पुरून उरेल, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. पक्षानं गटनेतेपदी नियुक्ती केली यासंदर्भात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की गटनेता म्हणून माझी नियुक्ती केली असून मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे.
भास्कर जाधव पुढं म्हणाले की, खर तर माझं म्हणणं होतं की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करावं पण उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला आणि त्यामुळे मी गटनेता म्हणून यापुढे शिवसेनेचे काम करेल, सर्व प्रश्न मांडेल.
सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं, असं मत जाधव यांनी मांडलं. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारचा विचार करून विरोधी पक्षनेते पदासाठी विचार व्हायला हवा, असं भास्कर जाधव म्हणाले. मात्र,हा सगळा निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर होईल. मंत्रिमंडळ स्थापन होईल शपथविधी होईल. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. विधानसभा अध्यक्षांना आम्ही विरोधी पक्ष नेता महाविकास आघाडीचा एकत्रित मिळून व्हावा यासाठी विनंती करू, असंही भास्कर जाधव म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा म्हणजे शिवसेनेचा होईल. त्यात जर मला ही जबाबदारी दिली तर मला नक्कीच विरोधी पक्ष नेता व्हायला आवडेल, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.
भास्कर जाधव यांनी मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं यासंदर्भात देखील माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांशी संवाद साधताना ते फडण"वीस" असले तरी आपण २० आहोत आपण पुरून उरु असं म्हटल्याचं देखील भास्कर जाधव म्हणाले.
इतर बातम्या :
आमदार होताच दिलीप वळसे पाटील घेणार शरद पवारांची भेट, मोठं कारण समोर