मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मिळालेलं यश पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे भाजप नेत्यांनाही अनपेक्षित असं बहुमत आणि संख्याबळ महायुतीसह सर्वच पक्षांना मिळाल्याने मतदान प्रक्रियेवरच विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट ईव्हीएम घोळ असल्याचे सांगत हा निकाल मान्य नसल्याचे म्हटले. त्यातच, सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत असून काही ठिकाणी मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि अधिकच्या मतदानावरुन संशय निर्माण होत आहे. आता, ईव्हीएम मशिनच्या (EVM) बॅटरीबाबत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य असल्याचे 172- अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी (Election Commission) यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी 172- अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही CUs मध्ये EVM पॉवर पॅक स्थिती 99% दर्शविली गेली, याबाबत एका उमेदवाराने क्षेप नोंदविला होता. 


भारत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत वस्तूस्थितीदर्शक खुलासा करताना 172- अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे की, EVM पॉवर पॅक 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला जोडणी देण्यासाठीची रचना आहे. जेंव्हा क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होते परंतु जेंव्हा बॅटरीची क्षमता 'थ्रेशोल्ड'च्या खाली कमी होते तेव्हा ते वेगाने घसरते. एकच BU आणि 1000 पेक्षा कमी मते नोंदविली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यास, बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आउटपुट व्होल्टेज 7.4V च्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे 99% क्षमता दर्शविली जाऊ शकते. म्हणून अशा परिस्थितीत ही एक सर्वसामान्य स्थिती असून याबाबतचा आक्षेप अयोग्य आहे. तसेच, अशाप्रकारे गैरसमज पसरविणे अयोग्य असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी म्हटले आहे. 


दरम्यान, येथील अनुशक्तीनगर मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फहाद अहमद यांचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर त्यांच्या पत्नी स्वरा भास्कर यांनी प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. "दिवसभर मतदान केलेल्या मशीनमध्ये 99% चार्ज झालेल्या बॅटरी कशा असू शकतात?" स्वरा यांनी X वर प्रश्न केला. "99% बॅटरी चार्ज करते", असा सवाल उपस्थित करत ईव्हीएम मतदानाच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवारांना पसंती मिळत असल्याचा आरोपही स्वरा यांनी केला होता. त्यावर, आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय. 


हेही वाचा


Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार