Bhandup West Vidhan Sabha: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदाची लढाई अटीतटीची मानली जात आहे. या मतदारसंघात कोकणी मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. 2009 मध्ये या मतदारसंघात मनसेचे शिशिर शिंदे विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे भांडुप पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते. यंदा रमेश कोरगावकर यांच्यासमोर शिंदे गटाचे अशोक पाटील आणि मनसेच्या शिरीष सावंत यांचे आव्हान आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे रमेश कोरगावकर आणि शिंदे गटाच्या अशोक पाटील यांच्या चुरशीची लढत असल्याचे सांगितले जाते. कोकणी मतदार ही शिवसेनेची पारंपरिक मतपेढी राहिली आहे. हे मतदार यंदा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यापैकी कोणाच्या बाजूने दान टाकणार यावर भांडुप पश्चिमचा निकाल अवलंबून आहे. या दोघांपैकी कोण बाजी मारणार, हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.