भंडारा: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याचं या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येतंय. अशाच प्रकारचं भंडारा (Bhandara Gram Panchayat Election) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपारा ग्रामपंचायतीत एक आगळीवेगळी निवडणूक होत आहे. या गावातील सरपंचपदासाठी दोन जिवलग मैत्रिणी आता एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पतीचं नाव आणि आडनाव एकच आहे. रश्मी राहुल राऊत आणि पल्लवी राहुल राऊत असे त्या जिवलग मैत्रिणींची नावे आहेत. 


भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपारा हे जवळपास 2 हजार लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव आहे. या ग्रामपंचायतीत 9 सदस्यांसाठी आणि सरपंचपदासाठी येत्या 18 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीअंतर्गत सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आले होते. त्यानुसार रश्मी आणि पल्लवी या दोघी जिवलग मैत्रिणी एकमेकांविरोधात सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. 


Bhandara Gram Panchayat Election: पतींची नावं आणि आडनावंही सारखीच


सरपंचपदासाठी एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या जिवलग मैत्रिणी रश्मी आणि पल्लवी या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातीलय दोघींनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही सोबतच घेतले. शाळेपासूनच त्या जिवलग मैत्रिणी आहेत. दोघींची लग्नंही लाखांदूर तालुक्यातील ओपारा या एकाच गावी झाले. विशेष म्हणजे दोघींच्याही पतीचे नाव आणि आडनावही सारखेच आहे. रश्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलकडून तर पल्लवी ग्रामविकास पॅनेलकडून सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उभ्या आहेत.


Bhandara Opara village Gram Panchayat Election: ही दोस्ती तुटायची नाही 


आम्ही दोघीही मैत्रिणी असून निवडणुकीमुळे मैत्रीचं नातं तुटणार नाही. सुरुवातीला आम्ही ज्या पद्धतीने वावरत असायचो, त्याच पद्धतीने यापुढे देखील वावरणार असल्याचं मत रश्मी राहुल राऊत यांनी व्यक्त केले तर आम्ही दोघेही मैत्रिणी सरपंचपदासाठी प्रतिस्पर्धक म्हणून निवडणूक रिंगणात उभ्या असून ही निवडणूक मैत्रीपूर्वकच व्हावी असे पल्लवी राहुल राऊत यांनी म्हटलं.
      
येत्या 18 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया अंतर्गत मतदान होणार असून दोन जिवलग मैत्रिणींपैकी कोण विजयी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.


ही बातमी वाचा: