सांगली : कृष्णा नदी पात्रातील मगरीने पुन्हा एकदा एका मुलाला नदीत ओढून नेलं आहे. सांगली नजीकच्या मौजे डिग्रज गावामध्ये एका मुलाला लक्ष्य करत मगरीने त्याला नदीत ओढून नेलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कृष्णा नदी पात्रात वावरणाऱ्या मगरीने आज गुरुवारी 12 वर्षीय मुलावर हल्ला केला. नदी काठावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील हा लहान मुलगा होता. आकाश मारुती जाधव असं या मुलाचे नाव असून तो मूळचा कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील आहे.



सध्या कृष्णेच्या नदीपात्रात मगरींचा प्रजननकाळ सुरु आहे. आज सकाळीही नर आणि मादी मगरींची प्रणयक्रीडा सुरु होती. गुडघाभर पाण्यातही मगरींचा वावर दिसल्याने आसपासच्या लोकांनी तिथून पळ काढला. मात्र या लहानग्याला त्याची माहिती नसल्याने तो काठावरच बसून होता. दुपारच्या सुमारास नदी काठावर येऊन मगरीने मुलाला ओढुन नेले आणि काही वेळाने सोडूनही दिलं. पण हा मुलगा नदीच्या पाण्यात पडल्याने या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागानेही मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नदी पात्रात बुडालेला हा मुलगा मात्र अजूनही सापडलेला नाही.

काही महिन्यांपूर्वीच औदुंबरमधील नदी पात्रातून एका मुलाला मगरीने ओढून नेलं होतं. एका दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्या मुलाचा मृतदेहच नदी पात्रात सापडला होता. आता अशीच घटना पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.