बीड : लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच राज्यात सर्वात शेवटी बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघाचा निकाला लागणार आहे. त्यामुळे, बीडकरांना विजयाचा जल्लोष करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे, बीडमध्ये पंकजाताई (Pankaja Munde) की बजरंग बप्पा? याच उत्तर राज्यातील निकालांत सर्वात शेवटीच पाहायला मिळेल. बीड लोकसभा मतदारसंघात माजलगाव तालुक्यातील एका मतदान (Voting) केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी केली जाणार आहे. माजलगाव शहरातील बुथ क्रमांक 68 वरील मतमोजणी सगळ्यात शेवटी केली जाणार असल्याचं आता प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मॉक पोलवेळी जे 50 मतदान केले होते, त्याच्या चिठ्ठ्या मिशनमधून बाहेर काढून टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे, प्रशासनाने या मॉक मतदान केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीडमध्ये एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात व ईव्हीएम मशिनवर आहेत. त्यामुळेही येथील मतमोजणीला विलंब लागणार आहे. 


लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतमोजणीला अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे. त्यामुळे, उमेदवार, कार्यकर्ते, नेतेमंडळींसह मतदारांचीही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे प्रशासनाने मतमोजणीची तयारी केली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले आहे.  त्यादृष्टीने जिल्हाधिकारी व त्यांची टीम कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, बीडमधील एका मतदान केंद्रावर सर्वात शेवटी मतदान होणार आहे.


बीड लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणी ही सगळी मतमोजणी संपल्यानंतर सर्वात शेवटी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कारण, मतदानादिवशी सर्वप्रथम सकाळी मतदानापूर्वी मॉक पोल घेण्यात आले होते. या मॉक पोलमध्ये 50 मतदान केले जाते, ह्या 50 मतदानाच्या चिठ्या बाहेर काढून टाकाव्या लागतात आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करावी लागते. मात्र, ह्या मॉक पोलवेळी मतदानाच्या 50 चठ्ठ्या तशाच राहिल्याने शेवटी आज जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या बुथ केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी केली जाणार आहे. येथील मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतमोजणी झाली असती तर पाचव्या फेरीमध्ये माजलगाव शहरातील बुथ क्रमांक 68 चे मतदान मोजले गेले असते. मात्र, आता हे मतदान सगळे मतदान मोजून झाल्यानंतर शेवटी मोजले जाणार आहे. त्यामुळे, बीडमधील लोकसभा निवडणुकांचा निकाल सर्वात शेवटी लागू शकतो. बीडमध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत आहे. 


बजरंग मुंडे विरुद्ध सोनवणेंमध्ये थेट लढत


बीड लोकसभा मतदारसंघात प्रथमदर्शनी एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात अटीतटीची बनली होती. येथील मतदारसंघात जातीय संघर्षा पाहायलाम मिळाला, त्यामुळेच येथील लढत रोमांचक व अटीतटीची ठरली आहे. भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात येथे थेट लढत होत आहे. वंचितने येथे उममेदवार दिला असून वंचितच्या उमेदवारास किती मतं मिळतात, हेही पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, लोकसभा प्रचारावेळी बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. तर, मुंडे बहिण-भावांनीही बजरंग सोनवणे निवडणुकीला जातीय रंग देत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, येथील मतदारसंघात जात हा फॅक्टरही महत्त्वाचा असणार आहे. 


बीडमध्ये पोलीस मीडियावर पोलिसांचा वॉच


लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी अनोखी कार्यपद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरची देखरेख वाढवली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप अॅडमिनवर बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. बीडमध्ये यंदाच्या निवडणुकीत जातीय तेढ पाहायला मिळाला. त्यातच, मुंडेवाडी गावातील एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियातूनही जातीय मतभेदाला खतपाणी घालण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच, लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर व्हाट्सअॅप ग्रुपवर जर आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली, तर ग्रुप ॲडमिनवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, विजयी उमेदवारासाठी मिरवणूक काढायची असल्यास परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. कोणालाही विनापरवानगी मिरवणूक काढता येणार नाही.