Parli Vidhan Sabha Elections 2024 : बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांनी धनंजय मुंडेंना आव्हान देत गंभीर आरोप केले आहेत. बीड जिल्ह्याचा बिहार होतोय, धनंजय मुंडेंना निवडणूक अधिकाऱ्यांचं पाठबळ मिळतंय, असा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे.


मतदानाची वेब कास्टिंग करावी - राजसाहेब देशमुख 


परळी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे उभे आहेत, तर शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना परळीतील हा संघर्ष अधिक पेटला आहे. राज्य निवडणूक आयोगाने परळी मतदारसंघात स्वतः लक्ष घालून बूथ एजंटवर निर्बंध घालावे, मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरा छेडछाड करून बोगस मतदानाला रोख लावून मतदानाची वेब कास्टिंग करावी, अशी मागणी राजसाहेब देशमुख यांनी केलीय.


निवडणूक अधिकाऱ्यांचं धनंजय मुंडेंना पाठबळ - राजसाहेब देशमुख 


मी मॅनेज उमेदवार असेल तर धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाच्या पिंडीवरील बेल उचलावा असे थेट आव्हान देशमुख यांनी दिलं. मी मॅनेज नसून त्यांचा लाभार्थी नाही. धनंजय मुंडे निष्क्रिय असून त्यांचं मतदारसंघात कोणतंही काम नाही. तसेच बीड जिल्ह्याचा बिहार होत असल्याचं म्हणत अधिकारी देखील याला पाठबळ देत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.


ही निवडणूक अंडरकरंट - राजेसाहेब देशमुख


धनंजय मुंडेंकडून मतदारसंघात कोणतीही मोठी सभा घेण्यात आली नसली तरी स्वतः शरद पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी मोठी सभा घेऊन थेट धनंजय मुंडेंना लक्ष केलं होतं. परंतु, याला धनंजय मुंडेंनी यानंतर कॉर्नर बैठकाच्या माध्यमातूनच उत्तर दिलं. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे मतदारसंघ पिंजून काढून मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असून अंडरकरंट आहे, लोकांना इथे शांती पाहिजे, कायद्याचं राज्य पाहिजे, येथील अराजकता बंद करायची आहे, असं ते म्हणतात. तसेच, लोकांना निवडणूक विकासाच्या टप्प्यावर घेऊन जायचं असल्याचंही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे.         


हेही वाचा:


मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट