बीड: राज्यातील बारामतीसह बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडें रिंगणात आहेत. मात्र, नेहमी छोट्या मोठ्या कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करणारे धनंजय मुंडे (dhananjay munde) यंदाच्या निवडणुकीत ना मोठ्या सभा, ना रॅली, ना बड्या नेत्यांची फेरी, इतकी शांततेत प्रचारयंत्रणा राबवत आहेत. त्यासंदर्भात बोलताना त्यांनी यंदाच्या परळी निवडणुकीचा पॅटर्न वेगळा असल्याचं म्हटलं. निवडणुकीचा फॉर्म भरायला सुद्धा मी गर्दी केली नव्हती, माणसं गोळा करायला आणि गर्दी करायला आपली कुणी शर्यतच लावू नये महाराष्ट्रात. यावेळी, शक्ती दाखवायची आहे, ती निकालाच्या दिवशी, पुन्हा म्हणून आपला नाद करायचा नाय, असे म्हणत धनंजय मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला. 


धनंजय मुंडे हे स्वतः राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आणि बहीण पंकजा मुंडे भाजपच्या स्टार प्रचारक असल्याने दोघा बहिण भावांच्या संयुक्त सभा मतदार संघात पार पडल्या आहेत. मात्र, एकाही बड्या नेत्याची सभा झालेली नाही. आजपर्यंत धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या सभेची चर्चा सबंध राज्यभरात झाली. परंतु, स्वतः निवडणुकीत उभे असताना देखील परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंकडून कोणतेही शक्ती प्रदर्शन अथवा मोठी सभा घेण्यात आलेली नाही. याचं कारण स्वतः धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेतून दिलं. त्यामुळे, अनेक जणांना हा प्रश्न पडलाय त्याची चर्चा देखील मतदारसंघात सुरू आहे. परळीची राज्यात चर्चा सुरू असताना परळीत मात्र शांतता आहे. रॅली नाही अर्ज दाखल करण्याच्या दिवशी रॅली नाही. फार सभा नाही पण मायबाप जनतेला विश्वास आहे. यंदा, मीच ठरवले आहे, ही निवडणूक सायलेंटली कोणताही गाजावाजा न करता लढवायची, यंदा निवडणुकीचा पॅटर्न बदलला असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितले. 


मी आणि आमचं काम यामुळे यंदा आम्हीच ठरवलं आहे. यंदाची निवडणूक ही सायलेंटली ग्राऊंड लेव्हलवर उतरुन गाजावाजा न करता जनतेपर्यंत पोहोचण्याचा नवा पॅटर्न राबवणारी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत मी व पंकजाताईंशिवाय इतर कोणाच्याही सभा इथं होणार नाहीत. इथं बाकीच्या कुणीही येऊन ताकद लावणं हे चालणारच, लोकशाही आहे. जे काम आजपर्यंत केलंय ते आठवण करुन देऊ, जे पुढे करणार आहोत, त्याचा विश्वास देऊ असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.   


ही निवडणूक अंडरकरंट - राजेसाहेब देशमुख


धनंजय मुंडेंकडून मतदारसंघात कोणतीही मोठी सभा घेण्यात आली नसली तरी स्वतः शरद पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी मोठी सभा घेऊन थेट धनंजय मुंडेंना लक्ष केले होते. परंतु, याला धनंजय मुंडेंनी कॉर्नर बैठकाच्या माध्यमातूनच उत्तर दिले. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मतदारसंघ पिंजून काढून मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असून अंडरकरंट आहे, लोकांना इथे शांती पाहिजे कायद्याचं राज्य पाहिजे, येथील अराजकता बंद करायची आहे, असे ते म्हणतात. तसेच, लोकांना निवडणूक विकासाच्या टप्प्यावर घेऊन जायचं असल्याचंही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा


येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला