बीड : बीड लोकसभेसाठी भाजपने महिन्याभरापूर्वीच डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता कोण उमेदवार याबद्दल उत्कंठा वाढत चालली आहे. असे असतानाच आता अमरसिंह पंडित यांच्या उमेदवारीवर एकमत होण्याची दाट शक्यता आहे. परळीत होणाऱ्या परिवर्तन यात्रेचा समारोप कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत त्यादिवशीच अमरसिंह पंडित यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यतासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळतं आहे.


भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या. खरतर मागच्या चार लोकसभा निवडणुकीचा विचार करता केवळ एका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार बीड लोकसभेतून निवडून आला होता. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्याविरुद्ध भाजपकडून प्रकाश सोळुंके यांच्यात लढत झाली होती. त्यातही जयसिंगराव गायकवाड हे विजयी झाले होते आणि हा चार लोकसभेच्या निवडणुकीतील एकमेव विजय राष्ट्रवादीच्या खात्यात जमा आहे.

यासोबतच बीड लोकसभा निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मागच्या चार लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली ते निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच भाजपमध्ये येऊन डेरेदाखल झाले आहेत. यात जयसिंगराव गायकवाड पाटील त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढणार रमेश आडसकर आणि 2014 ला गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून निवडणूक लढणारे सुरेश धस हे तिघेही कालांतराने भारतीय जनता पार्टी मध्ये येऊन दाखल झाले.

बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास

बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास तसा अनेक अर्थाने धक्का देणारा आहे. म्हणूनच क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते. तर कधी काळी डाव्यांना मोठी ताकद देणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख राज्यात बनली होती.

ओबीसी आणि मराठा या दोन्हीही राजकीय प्रवाहांचे तुल्यबळ नेतृत्व बीड जिल्ह्यात पाहायला मिळते. असे असले तरी अत्यल्प लोकसंख्या किंबहुना मतदान असलेल्या समाजातील नेतृत्वानेसुद्धा या जिल्ह्यावर आपली पकड ठेवली होती. केशरकाकू क्षिरसागर असोत की द्वारकादास मंत्री असोत यांनी आपल्या नेतृत्वाने बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात भरीव काम केले आहे.

मागच्या चार दशकापासून ज्या नावाभोवती बीडचे राजकारण कायम फिरत असते आणि या नावाचा दबदबा राज्यात किंबहुना देशात जाणवत गेला ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. मग पक्ष कोणताही असो बीड जिल्ह्यात निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची किंबहुना तालुका पातळीवरच्या निवडणूकांतसुद्धा मुंडेंचा स्पर्श होणार नाही अशी निवडणूक झाली नाही. स्वाभाविकपणे या सगळ्या प्रक्रियामध्ये जिल्ह्यात निर्णायक असलेल्या वंजारी समाज गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि मुंडेंनी शह-काटशह सोबतच बेरजेचे राजकारण करत राजकारणातील धुरंधर व्यक्तींना पराभूत करुन भारतीय जनता पार्टीची ताकत वाढवली.

म्हणूनच कधीकाळी श्रीपतराव कदम, सुंदरराव सोळंके, बाबुराव आडसकर, शिवाजीराव पंडित या प्रस्थापित मराठा समाजातील नेत्यांनासुद्धा गोपीनाथ मुंडे यांची राजकीय मदत घ्यावी लागली. काही अपवाद वगळता या सगळ्यांचे वारसदार हे गोपीनाथ मुंडेंचे बनले होते. असे असले तरी मुंडेंसमोर आव्‍हान राहिले ते शरद पवारांचे. कारण या जिल्ह्यातील राजकीय इतिहासात पवारांनीही मुंडेना राजकीय विरोध करण्याची कोणतीही कसर ठेवली नाही. म्हणूनच मुंडे यांच्या राजकारणाचा बालेकिल्ला राहिलेल्या बीड जिल्हा शरद पवारांवर ही प्रेम करणारा होता आणि हे अनेक निवडणुकांमधून समोर आले आहे. आज जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी पाच आमदार भाजपचे आणि एक आमदार राष्ट्रवादीचा आहे. कधीकाळी त्याच बीड जिल्ह्यात परिस्थिती उलट होती. त्यावेळी पाच आमदार हे राष्ट्रवादीचे तर केवळ एक आमदार भाजपचा होता. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि मुंडे विरुद्ध पवार हा संघर्ष जणू बीडच्या राजकीय इतिहासाचा अविभाज्य भाग बनला आहे..

सध्याची राजकीय परिस्थिती

बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पहाता जिल्ह्यातील एकूण सहा आमदारांपैकी पाच आमदार भाजपचे आणि एक आमदार राष्ट्रवादीचा आहे. विशेष म्हणजे जो आमदार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलाय तोही हल्ली भाजपाच्या व्यासपीठावर पाहिला मिळतोय. त्यामुळेच पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्याच्या राजकारणावर ती एकछत्री अंमल पाहायला मिळतोय. यासोबतच विधानपरिषदेवर निवडून आलेले सुरेश धस हे पंकजा मुंडे सोबत आहेत. याउलट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकछत्री अंमल निर्माण करण्यासाठी पक्षातच मोठा संघर्ष करावा लागतोय.

अर्थात जिल्ह्यातील एकूण राजकारण पाहता धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हा राजकीय संघर्ष या लोकसभा निवडणुकीत सुद्धा पहायला मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे एकीकडे पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत तर अमरसिंह पंडित धनंजय मुंडे यांचे कट्टर विश्वासू समर्थक हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय गणित

परळी विधानसभा : बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघांमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे ही लढत अगदी ग्रामपंचायत पातळीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. या लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या प्रीतम मुंडे या मूळच्या परळीच्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे  स्थानिकचा उमेदवार त्यांना जास्तीची पसंती मिळणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवाय परळी विधानसभा मतदारसंघावर गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व कायम राहिलेला त्याचाही फायदा या निवडणुकीत भाजपाला किती होतो हे पाहावे लागणार आहे.

केज विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून भाजपच्या संगीता ठोंबरे नेतृत्व करतात. भाजपला मानणारा मोठा मतदार या मतदारसंघात आहे. शिवाय या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची घडी मात्र आणखी विस्कटलेली आहे. राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विमल मुंदडा यांचं वर्चस्व या मतदार संघात होते.  मागच्या काही महिन्यात अक्षय मुंदडा हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. सध्या ते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसत असले तरी आणखी पक्षांतर्गत गटबाजी मात्र संपलेली नाही. म्हणूनच राष्ट्रवादीची विस्कटलेल्या घडी भाजपच्या पथ्यावर पडणार का हे निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

बीड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मानणारा मतदारांचा मतदारसंघ म्हणून पुढे आला. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच चुलत्या पुतण्याची चांगली चाललेली कुरघोडी यामुळे पक्षाचा कार्यकर्ता अस्वस्थ आहे. शिवाय जयदत्त क्षीरसागर हे तांत्रिक दृष्ट्या अजून तरी राष्ट्रवादी मध्येच आहे. तरी त्यांचं भाजपावर असलेलं प्रेम काही लपून राहिलेलं नाही. एक मात्र खरं की संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावली आहे म्हणूनच आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका हे निर्णायक ठरणार आहे. याच मतदारसंघावर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचाही प्रभाव आहे मात्र स्थानिक पातळीवर बीडच्या राजकारणात मेटे आणि भाजपात विळा भोपळ्याचे नाते असल्यामुळे मेटे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आष्टी विधानसभा मतदार संघात सध्या भाजपाचे भीमराव धोंडे हे आमदार आहेत. ते मागच्या चार टर्म आमदार राहिले होते. या मतदारसंघात सुरेश धस हेच भाजपामध्ये आल्यामुळे धोंडे आणि धस या जोड गोळी मुळे आष्टीत भाजपाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे. मात्र एकूणच धोंडे धस यांच्या राजकीय खेळी त्यासोबतच नातेवाईकांचे राजकारण याला राष्ट्रवादीतील ही नवखी मंडळी कसे आव्हान देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे लक्ष्मण पवार हे आमदार आहेत. हा मतदारसंघ लोकसभेचे संभाव्य राष्ट्रवादीचे उमेदवार अमरसिंह पंडित यांचे होम पीच आहे. म्हणून स्वाभाविकपणे स्थानिक आमदार म्हणून अमरसिंह पंडित यांच्यामागे मतदार उभे राहू शकतात. पण अमरसिंह पंडित यांचे कट्टर विरोधक बदामराव पंडित हे जरी शिवसेनेत असले तरी पंकजा मुंडे यांच्या सोबत त्यांची राजकीय समीकरणे जुळली आहेत. म्हणूनच बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार ही जोडगोळी सोबत असल्याने पंकजा मुंडे या अमरसिंह पंडित यांना त्यांच्याच होमपीचवर कसा आव्हान देतात हे पाहावे लागणार आहे.

माजलगाव विधानसभा मतदार संघात सध्या भाजपाचे आर टी देशमुख हे आमदार आहेत. भाजपाला मानणारा मोठा मतदार या मतदारसंघात आहे असे असले तरी प्रकाश सोळुंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा काम करणारा कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता मोहन जगताप आणि रमेश आडसकर ही लढवय्ये पंकजा मुंडे सोबत असल्यामुळे या विधानसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा हा सामना चांगलाच रंगणार हे मात्र नक्की आहे.

यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीवरती जिल्ह्यातील जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव पाहायला मिळालाय म्हणून जिल्ह्यात सर्वाधिक असलेल्या मराठा समाज त्यानंतर वंजारा समाज यासोबतच ओबीसी आणि मागासवर्गीय व मुस्लिम या जातीची राजकीय समीकरणे यावरती बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहेत. आगामी बीड लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे अभ्यासू आणि सुशिक्षित आहेत त्यामुळे ही लढत रंगतदार होणार हे मात्र नक्की.

संबंधित मतदारसंघांचा आढावा

चंद्रपूर लोकसभा मतदार संघ : युती न झाल्यास हंसराज अहिरांना शिवसेनेकडून तगडी टक्कर

जालना लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध खोतकर यांच्यात रणसंग्राम!

अकोला लोकसभा : प्रकाश आंबेडकरांचं राजकीय भवितव्य ठरणार

मावळ लोकसभा : शिवसेनेच्या हॅटट्रिकला पार्थ पवारांचं आव्हान?

दिंडोरी लोकसभा यंदा भाजपसाठी जड जाणार? राष्ट्रवादीचेही तगडे आव्हान

पालघर लोकसभेसाठी रस्सीखेच; शिवसेना, भाजपची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेसाठी राऊत आणि राणे यांच्यात प्रमुख लढत