नवी दिल्ली : भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह चंद्रा हे निवडणूक आयोगाचे कामकाज पाहणार आहेत.


चंद्रा यांचा जन्म 15 मे 1957 चा असून ते 1980 च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस.) अधिकारी आहेत. त्यांनी आय.आर.एस. सेवेदरम्यान उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात आदी राज्यामध्ये काम केले आहे. रुरकी विद्यापीठ तसेच डेहराडून येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले आहे.

चंद्रा यांनी अंतर्गत कररचना आणि अन्वेषण कार्यात विशेष योगदान दिले आहे. मुंबई येथे अन्वेषण विभागाचे संचालक आणि गुजरातचे अन्वेषण महासंचालक म्हणून प्रभावी कामकाज केले असून सिंगापूर, आयआयएम बेंगळुरू आदी ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार संभाळण्यापूर्वी ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, महसूल विभागांतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सी.बी.डी.टी.) अध्यक्ष म्हणून तसेच सी.बी.डी.टी.चे सदस्य (अन्वेषण) म्हणून कार्यरत होते.