Beed Gram Panchayat Election : राज्यात सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरु आहे. गावगाड्याचे इच्छुक कारभारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यामध्ये अनेक लक्षवेधी घटना समोर येताना दिसत आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील परळीमध्ये आज (2 डिसेंबर) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका महिला उमेदवाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे चित्र दिसून आले. काही दिवसांपूर्वीच प्रसुती (Delivery) झालेल्या एका महिला उमेदवाराने ॲम्बुलन्समधून (Ambulance) येत सरपंचपदासाठी (Sarpanch) अर्ज भरला आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अंतिम दिवस आहे. या निवडणुकीसाठी वानटाकळी गावाच्या सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवार सौ. पल्लवी अरुण माने या चक्क ॲम्बुलन्समधून आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाल्या. सौ. पल्लवी माने यांची काही दिवसांपूर्वीच प्रसुती झाली आहे. मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या स्वतः आपल्या कुटुंब आणि कार्यकर्त्यांसह चक्क ॲम्बुलन्समधूनच उमेदवारी दाखल करण्यासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांचं नवजात बाळही सोबत होतं. ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना परळीत लक्षवेधी ठरली आहे.
PHOTO: राज्यभरात भावी सरपंचांनी काढली रात्र जागून, कारण होतं...
ऑफलाईन अर्ज भरतानाही अडचणी, वेळ वाढवून देण्याची उमेदवारांची मागणी
ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शासनाकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ऑफलाईन अर्ज स्वीकारताना देखील अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. बीडमधल्या शासकीय आयटीआयमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली आहे तर आष्टीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणाऱ्या ठिकाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी जरी मुभा दिली असली तरी देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंतच हे अर्ज भरावे लागणार आहेत. त्यामुळे आणखी वेळ वाढवून देण्याची मागणी उमेदवार करत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस
बीड जिल्ह्यात होत असलेल्या 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी एकूण 1 हजार 998 अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले असून सदस्यपदासाठी 8 हजार 591 अर्ज दाखल झाले आहेत. 5 डिसेंबर रोजी या अर्जांची छाननी होईल आणि 7 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून गावांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.